Mumbai Water Supply : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची तहान ठाणे जिल्ह्यात उभारण्यात आलेली धरणे भागवित असतात. ठाणे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या की मुंबईकरांच्या जीवात जीव येतो. जुलै महिन्यात कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातील जवळपास सगळी धरणे काठोकाठ भरून टाकली आहेत. भातसा, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा अशी मोठी धरणे भरत आल्याने मुंबईकरांची पाणीटंचाई मिटली. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी हे एमआयडीसीच्या मालकीचे सर्वात मोठे धरणही रविवारी रात्री भरून वाहू लागले. बारवी भरल्याचा मोठा दिलासा असला तरी गेल्या काही वर्षांत ठाणे जिल्ह्याचे होत असलेले नागरीकरण पाहता हे धरण आता जिल्ह्यातील प्रमुख शहरांसाठी कमी पडू लागल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. पाणी वितरण व्यवस्थेतील दोष, कोणत्याही नियोजनाविना उभी राहत असलेली नवी बांधकामे, लाखोंच्या संख्येने वाढणारी लोकसंख्या यामुळे ठाण्यासह जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांना टँकर आणि त्यावर पोसल्या जाणाऱ्या व्यवस्थेचा विळखा पडू लागला आहे
ठाणे जिल्ह्यातील शेवटच्या मोठ्या धरणाची उभारणी जवळपास ५४ वर्षांपूर्वी बारवी धरणाच्या रूपाने झाली. या काळात जिल्ह्याची लोकसंख्या आणि शहरांचा विस्तार अनेक पटींनी वाढल्याने बारवीसारख्या दोन धरणांची गरज आहे. मात्र काळू आणि शाई ही प्रस्तावित धरणे कागदावरच असल्याने भविष्यात टंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची चिन्हे आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि अंबरनाथ तालुक्यांत मोठी धरणे आहेत. यात बारवी, भातसा, तानसा, मोडकसागर आणि मध्य वैतरणा या धरणांचा समावेश आहे. यातील भातसा, तानसा, मोडकसागर आणि मध्य वैतरणा या धरणांमधून मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे मुंबईची तहान भागविण्यात ठाणे जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. दुसरीकडे औद्योगिक क्षेत्रासाठी एमआयडीसीने उभारलेल्या बारवी धरणातून ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर आणि अंबरनाथ या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. ठाणे महापालिकाही भातसा धरणातून स्वतःच्या योजनेसाठी पाणी घेते.
बारवीच्या पाण्याचे वाटप
एमआयडीसीच्या बारवी धरणातील पाण्यावर ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरे आणि औद्योगिक क्षेत्र अवलंबून आहेत. उपलब्ध वाटपानुसार औद्योगिक वापरासाठी १५० दशलक्ष लिटर, नवी मुंबईसाठी ७५ दशलक्ष लिटर, ठाण्यासाठी १४१ दशलक्ष लिटर, मीरा-भाईंदरसाठी ९० दशलक्ष लिटर, कल्याणसाठी ७५ दशलक्ष लिटर, उल्हासनगरसाठी १५५ दशलक्ष लिटर, पनवेलसाठी १ दशलक्ष लिटर, अंबरनाथसाठी २१ दशलक्ष लिटर, ग्रामपंचायती आणि इतरांसाठी ५५ दशलक्ष लिटर पाणी वितरित केले जाते. याशिवाय जलवाहिन्यांमधील वहन व्यय सुमारे ७० ते ८० दशलक्ष लिटर आहे. या आकडेवारीवरून बारवी जलस्रोतावर किती मोठा भार आहे, हे स्पष्ट होते. वाढत्या लोकसंख्येसोबत पाण्याची मागणी वाढत असताना या एकाच मोठ्या जलस्रोतावर अवलंबून राहण्याची मर्यादा आता स्पष्ट होऊ लागली आहे.
ठाण्यात मोठी पाणीटंचाई
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सुमारे २७ लाखांच्या घरात आहे. हक्काचे स्वतंत्र धरण नसल्यामुळे महापालिका विविध जलस्रोतांवर अवलंबून आहे. शहराला दररोज ६२१ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात सुमारे ५९० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे दररोज ३१ दशलक्ष लिटरची तूट असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. या तुटवड्याचा परिणाम विशेषतः घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरावर होत आहे. कल्याण-डोंबिवली शहराला एकूण ३६० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. तसेच एमआयडीसीकडून १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. भिवंडी-निजामपूर महापालिका क्षेत्रात दररोज १६२ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना केवळ ११५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे तब्बल ४७ दशलक्ष लिटरचा तुटवडा आहे. बदलापूर शहराला उल्हास नदीवरील बॅरेज, तर अंबरनाथला बॅरेज आणि बारवी तसेच चिखलोली धरण या तीन जलस्रोतांतून मजीप्रा आणि एमआयडीसीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. या सर्वच शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
शहरांमध्ये टँकर लॉबी सक्रिय…
एकेकाळी उन्हाळ्यात शहापूर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आता ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरी पट्ट्यांमध्येही टँकरची गरज वाढली आहे. त्यामुळे टँकर हा तात्पुरता पर्याय राहिलेला नाही. जिल्ह्यातील सर्वच शहरांची पाण्याची गरज भागविण्यासाठी टँकर व्यवस्था ही अविभाज्य भाग बनण्याची भीती आता व्यक्त होत आहे. वर्षातील कोणताही महिना असो. घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणीटंचाईची समस्या सतत जाणवते. कल्याण पूर्वेतील खडेगोळवली, चिंचपाडा, वालधुनी परिसर, टिटवाळा, बल्याणी परिसरातील चाळी, डोंबिवलीतील देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, डोंबिवली पूर्वेतील आयरे, म्हात्रेनगर, कोपर पूर्व भाग कधीही टंचाईमुक्त झालेले नाहीत. भिवंडीतील नजराना कंपाऊंड, अशोकनगर, गोपालनगर, मिल्लतनगर आदी भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. अंबरनाथ, बदलापूरमध्येही हीच अवस्था आहे. नागरिकांना पाण्याची गरज भागविण्यासाठी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागते. यातूनच या शहरांमध्ये टँकर लॉबी सक्रिय झाल्याचे दिसून येते. ठाण्यासारखी महापालिका तर शहरात पाणी पुरविण्यासाठी टँकर भाड्याने घेते. त्यासाठी निविदा काढते. टँकर पुरविणारे मोठे ठेकेदार, कंत्राटदार लाखो लिटर पाणी कसे आणि कोठून उपलब्ध करतात, याच्याही सुरस कहाण्या आहेत. ठाणे, नवी मुंबईच्या तलावांच्या पाण्यावर यापैकी काहींनी डल्ला मारल्याचे सांगितले जाते. काही गावांलगत असलेले तलाव पावसाळ्यात भरतात आणि त्यामध्ये वर्षाचे १२ महिने पाणी असते. तलावांलगत असलेल्या विहिरींनाही पाणी असते. गावातील वजनदार नेते, त्यांचे समर्थक पाणी उपशासाठी या टँकर ठेकेदारांना तलावही भाड्याने देऊ लागल्याचे सांगितले जाते. काही विहिरींवर ताबा मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा आहेत. यातून टँकर आणि पाणी पुरवली जाणाऱ्या स्थानिक पुरवठादारांची एक नवी व्यवस्था अलिकडच्या काळात उभी राहिली आहे.
५४ वर्षांत नवे धरण नाही
ठाणे जिल्ह्यातील शेवटच्या मोठ्या धरणाची उभारणी जवळपास ५४ वर्षांपूर्वी बारवीच्या रूपाने झाली. मुळात बारवी धरण औद्योगिक वापरासाठी उभारण्यात आले होते. मात्र कालांतराने त्यातील पाण्यावर ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांचा मोठ्या प्रमाणावर दावा निर्माण झाला. आज या धरणावर शहरी, औद्योगिक आणि ग्रामीण पाणीपुरवठ्याचा भार आहे. बारवीतून अधिक पाणी मिळावे, यासाठी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागण्या केल्या जातात. परंतु धरणाच्या क्षमतेपेक्षा शहरांना पाणी देणे शक्य नाही. गेल्या ५४ वर्षांत वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत नवे मोठे धरण किंवा कायमस्वरूपी जलस्रोत उभारले गेले नाही. त्यामुळे जुन्या जलस्रोतांवरच वाढता भार टाकून पाणी नियोजन केले जात आहे. हे नियोजन कितपत टिकाऊ ठरणार, हा मूळ प्रश्न आहे. ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यावर शाई आणि काळू धरणाला गती देण्याची मागणी पुन्हा पुढे येते. मात्र गेल्या १४ वर्षांत या प्रकल्पाची साधी वीटही रचली गेलेली नाही. सुरुवातीच्या काळात प्रकल्प रेटून पुढे नेण्याच्या प्रयत्नांवर न्यायालयाने ताशेरे ओढले. त्यानंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे स्थानिक आदिवासी बांधव आणि ग्रामस्थांचा यंत्रणेवरील विश्वासही कमी झाला. आधी पुनर्वसनाचा आराखडा, त्यानंतरच प्रकल्पाला परवानगी, अशी भूमिका स्थानिक ग्रामस्थांकडून घेतली जात आहे. त्यामुळे काळू धरणाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. दुसरीकडे शाई धरणाचाही प्रस्ताव कागदावरच आहे.
आज धरणे भरली; उद्याच्या पाण्याचे काय?
यंदा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील प्रमुख धरणे भरली आहेत. त्यामुळे सध्या जलसाठ्याची कमतरता नसली, तरी पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन हा खरा प्रश्न आहे. ठाणे जिल्ह्याच्या लोकसंख्येत झालेली वाढ, शहरांचा विस्तार, नव्या गृहसंकुलांची उभारणी आणि औद्योगिक क्षेत्राची वाढ यामुळे गेल्या काही वर्षांत पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण बारवी धरणावर अधिकाधिक भार टाकण्याऐवजी नव्या जलस्रोतांची निर्मिती करणे आवश्यक आहे. मात्र गेल्या ५४ वर्षांत नवे मोठे धरण उभे राहिलेले नाही. काळूला १४ वर्षांत प्रत्यक्ष आकार आलेला नाही, तर शाईसारखे प्रस्तावही कागदावर आहेत. आज धरणे भरलेली असली तरी नव्या जलस्रोतांची निर्मिती झाली नाही, तर उद्या ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाण्यासाठी टँकरवर अधिकाधिक अवलंबून राहावे लागू शकते. यातून टँकर लॉबीचे महत्त्व आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
