ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र तसेच टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब उपकेंद्रामध्ये पावसाळ्यापूर्व आवश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदरसह काही भागात उद्या, ३ जूनला पाणी पुरवठा १२ तास बंद राहणार असल्याचे ठाणे महापालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून पावरण्याचे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

देखभाल दुरुस्तीच्या कामामध्ये कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आणि अन्य तांत्रिक कामांचा समावेश असून, ही कामे बुधवार ३ जूनला सकाळी जी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत करण्यात येणार आहेत. या कामांसाठी ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्राधिकरणाच्या पाणीपुरवठ्याचा १२ तासांचा बंद घेण्यात येणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटरनिटी जंक्शन, मुंब्रा तसेच कळव्याच्या काही भागांमध्ये सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

या बंदनंतर पाणीपुरवठा पूर्वपदावर होईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.