ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत असतानाच, कळवा, मुंब्रा, दिवा तसेच ठाणे शहरातील काही भागांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा गुरूवारी बंद राहणार आहे. जलवाहिनी दुरुस्ती कामासाठी हा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार असून या बंदनंतर पाणीपुरवठा सुरू झाल्यावर एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागातील संकुले टँकरद्वारे पाणी विकत घेत आहेत तर, जुन्या ठाण्यातही काही संकुलांना टंचाईच्या झळा बसत आहेत. कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातही टंचाईची समस्या असून सोमवारी आम आदमी पक्षाने कळवा पुर्वेतील पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून पालिका मुख्यालयासमोर आंदोलनही केले. एकूणच शहराच्या विविध भागात पाणी टंचाईची समस्या जाणवत असतानाच, त्यात आता कळवा, मुंब्रा, दिवा तसेच ठाणे शहरातील काही भागांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा गुरूवारी बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय येथील जलवाहिनी क्रमांक १, २ व ३ वर उन्नतीकरण तसेच तातडीच्या देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे गुरुवार,७ मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते शुक्रवार, ८ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत असा २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
कोणत्या भागात पाणी नाही
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी पुरवठा बंद राहणार असून या कालावधीत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१) मधील काही भाग वगळता), कळवा या प्रभाग समित्यांतील सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच वागळे प्रभाग समितीतील रुपादेवी पाडा, किसननगर क्र. २, नेहरूनगर आणि मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव या भागांचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे.
पाणी जपून वापरा
पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.
