ठाणे : अल्-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात उद्भवू शकणाऱ्या दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने नियोजन करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिका क्षेत्रात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. यापूर्वी ही पाणीकपात प्रत्येक बुधवारी करण्याचे जाहीर करण्यात आले होते.
मात्र, आता या नियोजनात बदल करण्यात आला असून, बुधवारऐवजी २ नोव्हेंबरपासून प्रत्येक सोमवारी १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेची स्वतःची पाणीपुरवठा योजना आणि स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा. लि. यांच्या माध्यमातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनात हा बदल करण्यात आला आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बुधवारी स्टेम वॉटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, महापालिकेचे अधिकारी, स्टेम प्राधिकरणाचे अधिकारी यांचे समवेत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत दर महिन्याच्या बुधवार ऐवजी प्रत्येक सोमवारी पाणी कपात करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी बुधवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले होते. मात्र २ नोव्हेंबरपासून प्रत्येक सोमवारी पाणीकपात होणार असून नागरिकांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी. प्रत्येक सोमवारी करण्यात येणाऱ्या पाणीकपातीचा परिणाम घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, ईटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा तसेच कळव्याच्या काही भागांतील पाणीपुरवठ्यावर होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
