ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र तसेच टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब उपकेंद्रामध्ये पावसाळ्यापूर्वी आवश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदरसह काही भागात आज, बुधवारी १२ तासांसाठी तर गुरुवारी एल निनोच्या पार्श्वभूमीवर २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

पावसाळ्यापूर्वी पाणी पुरवठा योजनेतील केंद्रांची देखभाल दुरुस्ती महापालिकेकडून केली जाते. देखभाल दुरुस्तीच्या कामामध्ये कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आणि अन्य तांत्रिक कामांचा समावेश असून, ही कामे बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत करण्यात येणार आहेत. या कामांसाठी ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्राधिकरणाच्या पाणीपुरवठ्याचा १२ तासांचा बंद घेण्यात येणार आहे.

त्यामुळे घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटरनिटी जंक्शन, मुंब्रा तसेच कळव्याच्या काही भागांमध्ये सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या बंदनंतर पाणीपुरवठा पूर्वपदावर होईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

तर गुरुवारी एल निनोच्या पार्श्वभूमीवर २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. एलनिनो व आयओडीच्या प्रभावामुळे समुद्र प्रवाह सक्रिय झाल्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जांभूळ जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा गुरूवारी दुपारी १२ ते शुक्रवार दुपारी १२ वाजेपर्यत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये आणि वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रातील रुपादेवी पाडा, किसननगर क्र. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील.