ठाणे – जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणी टंचाईची झळ बसत असून आता शहरी भागातही विविध ठिकाणी पाणी टंचाई सुरू झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात तीव्र उन्हाळ्याचा इशारा दिलेला असतानाचा एप्रिल महिन्याच्या अखेरीस ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाचा पाणीसाठा हा ४०.३० टक्क्यांवर आला आहे. तर आंध्रा धरणातील पाणीसाठा देखील ४१.७ टक्क्यांवर आला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे आतापासूनच खबरदारी म्हणून नागरिकांनी तसेच औद्योगिक क्षेत्राने मे ते जून या कालावधीत पाणी अत्यंत जपून वापरावे असे आवाहन जिल्हा पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात यंदाचा उन्हाळा तीव्र झाला असून तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच उष्णतेची तीव्रता जाणवू लागली आणि एप्रिलच्या अखेरीस ती अधिकच वाढली आहे. मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये दररोज कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम पाण्याच्या वापरावर झाला असून सर्वत्र पाण्याची मागणी वाढली आहे. विशेषतः ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरी, तलाव आणि इतर नैसर्गिक जलस्रोत आटल्याने अनेक गावांमध्ये काही आठवड्यांपासून टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
शहरी भागातही चित्र फारसे वेगळे नाही. ठाणे जिल्ह्यातील अनेक गृहसंकुलांमध्ये नियमित पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने टँकरची मदत घ्यावी लागत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासूनच पाणीटंचाईची तीव्रता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. दरम्यान, उपलब्ध जलसाठ्याचा विचार करता जिल्ह्यातील स्थानिक पालिका प्रशासन पाणी साठ्याबाबत नियोजन करत आहे. पुढील काही आठवड्यांत उष्णतेचा जोर कायम राहिला आणि पाण्याची मागणी अशीच वाढत राहिली, तर जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये पाणी कपात करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यातील नागरी वसाहती तसेच औद्योगिक वसाहतींना मुरबाड तालुक्यातील एमआयडीसीच्या बारवी धरणातून आणि पुणे जिल्ह्यातील टाटा कंपनीच्या आंध्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. बारवी धरणाची एकूण पाणी पातळी क्षमता ही ३३८.८४ दशलक्ष लिटर इतकी आहे. सद्यस्थितीत बारवी धरणात एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत उपयुक्त पाणीसाठा हा १३६.५४ दशलक्ष लिटर म्हणजेच ४०.३० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर आंध्रा धरणाची एकूण पाणी पातळी क्षमता ३३९.१४ दशलक्ष लिटर इतकी आहे. सद्यस्थितीत आंध्रा धरणात १४१.३७ दशलक्ष लिटर म्हणजेच ४१.७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या स्थितीवर उपाययोजना म्हणून ठाणे जिल्हा प्रशासनामार्फत ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत शहापूर तालुक्यात एकूण २२ गावे व ९६ पाडे टंचाईग्रस्त असून या भागांमध्ये ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच मुरबाड तालुक्यात १ गाव व ३ पाडे टंचाईग्रस्त असून या भागासाठी १ टँकर कार्यरत आहे.
