ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील २९ लाख नागरिकांना टंचाईच्या काळात पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेच्या ताफ्यात अवघे सहा टँकर उपलब्ध आहेत. यामुळे घोडबंदरवासियांना टंचाईच्या काळात खासगी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येणार आहे. यामध्ये कोट्यवधी रुपये खर्ची पडणार असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, खासगी टँकरची आकडेवारीच महापालिकेकडे उपलब्ध नसल्याचे सांगत प्रशासनाने लूट करण्याची सूट दिल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. वाढीव पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांकडे मागणी करूनही त्यावर निर्णय होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यातील धरणे शंभर टक्के भरली असली तरी, ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक भागात आजही पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. विशेषत: नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात ही समस्या अधिक जाणवत आहे. यातूनच खासगी टँकरने पाणी विकत घेण्याची नामुष्की ओढवत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी बुधवारी अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांचे प्रतिनिधी यांच्यासोबत घोडबंदर परिसराची पाहणी केली. यावेळी मानपाडा येथील हिलक्रिस्ट सोसायटी, एन.जी. रेसिडेंसी, पातलीपाडा हिरानंदानी परिसर, ऋतू इस्टेट, क्लासिक कॉसमॉस, यशस्वीनगर म्हाडा सोसायटी, मरीआई नगर ढोकाळी, वसंत विहार, हवामहल, पिनॅकल सोसायटी आदी परिसरातील रहिवाशांनी पाणी टंचाईच्या व्यथा मांडल्या.
तांत्रिक अडचणी तातडीने सोडवण्याचा निर्णय काही गृहसंकुलांना पाच मिनिटे, काहींना तासभर तर काहींना सकाळी किंवा संध्याकाळी अपुऱ्या प्रमाणात पाणी मिळत असल्याच्या तक्रारी करत रहिवाशांनी अधिकाऱ्यांसमोर केल्या. त्यांच्या समस्या ऐकून त्यांचे निरसन करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ज्या-ज्या ठिकाणी तांत्रिक अडचणी आहेत, त्या तातडीने सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला. अनधिकृत नळजोडण्यांमुळे पाणीचोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याने या जोडण्यांवर देखील कारवाई करण्याच्या सूचना केळकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
खासगी टँकरचालकांना रान मोकळे
शहराला ६२५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना सद्यस्थितीत ४० दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता आहे. घोडबंदर परिसराला सध्या किमान १० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाण्याची गरज आहे. मात्र संपूर्ण शहरासाठी ठाणे महापालिकेकडे फक्त सहा पाण्याचे टँकर आहेत. त्यामुळे खासगी टँकर लॉबीला नागरिकांची लूट करण्यास रान मोकळे मिळाले आहे. प्रशासन पाणीटंचाईबाबत गंभीर नसून खासगी टँकर लॉबीला पाठीशी घालत असल्याचा आरोप केळकर यांनी केला.
पालकमत्र्यांकडे तक्रार करुनही निर्णय नाही
अतिरिक्त १० दशलक्ष लिटर पाण्याची कसर भरून काढण्यासाठी कच्चे पाणी घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुरवठा करावा किंवा स्टेम, भातसा किंवा मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ही गरज तातडीने पूर्ण करण्याची मागणी केळकर यांनी केली. वाढीव पाणी पुरवठ्याबाबत सातत्याने पाठपुरावा करताना पालकमंत्र्यांकडे देखील मागणी केली आहे. तरीही अद्याप यावर निर्णय होत नसल्याची खंत केळकर यांनी व्यक्त केली. आता सणावाराचा काळ असल्याने पाणी टंचाईची अधिक झळ नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे लवकरच सर्व विभागांची बैठक घेऊन अतिरीक्त पाण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
