ठाणे : ठाणे शहरात रोज ४० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची कमतरता असल्याने गंभीर टंचाईला सामोरे जावे लागत आहे. असे असताना ठाणे महापालिकेने परवानगी दिल्याने १५० मीटर उंचीच्या ७९ इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे लोकसंख्या आणखी वाढून पाणीटंचाईचे चटके आणखी तीव्र होणार आहेत. २०१७ मध्ये उच्च न्यायालयाने पुरेसे पाणी उपलब्धता होत नाही, तोपर्यंत नव्या इमारत बांधकामांना परवानगी देण्यास मनाई केली होती. मात्र, महापालिकेने खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने बांधकाम स्थगिती उठविण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार संजय केळकर यांनी केला.

ठाणे शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहत आहेत. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ठाणे शहरात पाणी कपातीच्या समस्या गंभीर होणार आहेत. शुक्रवारी आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात ठाणे शहरातील पाणीटंचाई संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींनंतर त्यांनी महापालिकेच्या शहर नियोजनावर टीका केली.

ठाणे शहराला आधीच ४० एमएलडी पाण्याची कमतरता असल्याने गंभीर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. असे असताना महापालिकेने परवानगी दिल्याने १५० मीटर उंचीच्या ७९ इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पुढील काळात लोकसंख्या आणखी वाढून पाणीटंचाईचे चटके आणखी तीव्र होणार आहेत.

२०१७ साली उच्च न्यायालयाने पुरेशा पाण्याची उपलब्धता होत नाही तोपर्यंत नव्या इमारत बांधकामांना परवानगी देण्यास मनाई केली होती. मात्र, महापालिकेने खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने बांधकाम स्थगिती उठविण्यात आल्याचे केळकर यांनी सांगितले. वृद्धाला मदत या वेळी एका निवृत्ती वेतनधारक ज्येष्ठ नागरिकाने उपस्थित राहून व्यथा मांडली. कुटुंबीयांनी त्याला घराबाहेर काढले असल्याने निराधार जीवन जगत आहे. याबाबत एका वृद्धाश्रमाशी संपर्क साधला असून लवकरच त्या व्यक्तीला वृद्धाश्रमात दाखल करणार असल्याचे केळकर यांनी सांगितले.