ठाणे – नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसरातील नव्या गृहसंकुलांसह कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील अनेक इमारतींना आजही टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. शहरातील अस्तित्वातील इमारतींची तहान भागवितानाच महापालिकेची दमछाक होत असतानाच, नव्या बांधकामांची भर पाणीपुरवठा यंत्रणेवर पडू नये, यासाठी पाणीपुरवठा विभागाने आता कठोर भूमिका घेतली आहे. बांधकाम परवानगी देणाऱ्या शहर विकास विभागासोबत झालेल्या बैठकीत अतिरिक्त पाणी उपलब्ध होईपर्यंत नवीन बांधकामांना पाणी देता येणार नसल्याचे पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केल्याने विकासकांपुढे नवीन इमारत बांधकाम परवनगीचा मोठा पेच निर्माण झाला आहे.

ठाणे महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात नगर अभियंता सुरेंद्रकुमार काटकर यांनी बैठक घेऊन पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीत आगामी काळातील पाणीटंचाईचा संभाव्य धोका लक्षात घेऊन विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस सर्व उपनगरअभियंता, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उद्यान, घनकचरा, प्रदुषण, यांत्रिकी, माहिती व जनसंपर्क या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ठाणे शहरात वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. मात्र, उपलब्ध पाणी आणि दररोजची मागणी यामध्ये तफावत आहे. त्यातच अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत अस्तित्वातील इमारतींचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे हेच महापालिकेसमोर आव्हान असताना नव्या इमारतींना पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याची भूमिका पाणी पुरवठा विभागाने बैठकीत मांडली.

अतिरिक्त पाणी उपलब्ध होईपर्यंत यापुढे नवीन इमारतींना महापालिकेचे पाणी देता येणार नाही. त्यामुळे बांधकाम परवानगी देतानाच महापालिका पाणी उपलब्ध करून देऊ शकत नाही आणि विकासकांनी पाण्याची पर्यायी व्यवस्था स्वतः करावी, अशी अट परवानगीमध्येच नमुद करावी. यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून तो आयुक्तांपुढे मंजुरीसाठी सादर करावा, अशी सुचना नगर अभियंता सुरेंद्रकुमार काटकर यांनी शहर विकास विभागाला केली. नव्या इमारतीच्या बांधकामांसाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यास बंधनकारक करावे.

नवीन इमारतींमध्ये पाण्याची बचत करणारी शौचालये, फ्लशिंग आणि पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र जलवाहिन्या आणि स्वतंत्र टाक्यांची व्यवस्था असावी. अशा पर्यावरणपूरक आणि पाणी बचतीच्या उपाययोजना करणाऱ्या विकासकांना प्रोत्साहन देण्यासाठी नामांकन देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. दैनंदिन पाणी उचल, मागणी आणि संभाव्य तूट यांचे नियमित विश्लेषण करून जलसाठ्याचा काटकसरीने वापर करणे, जलशुद्धीकरण प्रकल्पातील पंपिंग व्यवस्था सक्षम ठेवणे आणि जलकुंभातून संतुलित वितरण करण्यावर भर देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.

ठाणे शहरात होणारा पाणी पुरवठा पुरेसा नाही. त्यातच अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी उपलब्ध होईपर्यंत नवीन इमारतींना पाणी देणे शक्य नाही. या पाश्वभूमीवर नवीन बांधकामांना परवानगी देतानाच महापालिका पाणी देऊ शकत नाही आणि विकासकांनी पाण्याची पर्यायी व्यवस्था स्वतः करावी, अशी अट नमुद करावी. यासंबंधीचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवावा, अशी सुचना शहर विकास विभागाला केली आहे. – सुरेंद्रकुमार काटकर, नगर अभियंता, ठाणे महापालिका