ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होऊ लागली असतानाच, शहराच्या विविध भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यातच आता मुख्य जलवाहीनी दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून या निर्णयामुळे शनिवारी संपुर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या बंदनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने ऐन उन्हाळ्यात ठाणेकरांपुढे पाणी संकट उभे राहिल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहराला प्रत्यक्षात दररोज ५९० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.

महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या मानाने शहराला प्रतिदिन ६२१ दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र, ५९० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत असून शहराला ३१ दशलक्षलीटर इतके पाणी कमी मिळत आहे. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. जल शुद्धीकरण केंद्र परिसरात वीज पुरवठा खंडीत झाल्याने गेल्या आठवड्यात शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता. दोन दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होत असतानाच, आता पुन्हा जलवाहीनी दुरुस्तीसाठी शहराचा पाणी पुरवठा पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीतून माजिवडा जंक्शन येथे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. ही गळती तातडीने बंद करणे आवश्यक आहे. या कामासाठी शनिवार, ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ ते रविवार १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यत असा २४ तास शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, या कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. या कामाकरिता गोल्डन डाईज माजिवडा जंक्शन येथील सेवा रस्ता बंद ठेवावा लागणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

कोणत्या भागात पाणी नाही

ठाणे महापालिका क्षेत्रातील दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर, रघुकुल, पारसिक नगर, आतकोनेश्वर नगर परिसर, पौंड पाडा, आतकोनेश्वर, खारेगाव, कळवा, मनिषानगर, क्रांतीनगर, साकेत कॉम्प्लेक्स, महागिरी, खारटन रोड, सिडको बसस्टॉप परिसर, कोपरी कोळीवाडा,पंचगंगा, राबोडी १ आणि २, आकाशगंगा, बाळकुम, राम मारुती नगर, लोढा अमारा, कल्पतरु, ब्रह्मांड, रुतु सिटी, गोकुळनगर, आझादनगर, मसनवाडा, रुतु पार्क परिसर, लोकमान्य नगर, इंदिरानगर, सावरकर नगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, रामनगर, कैलासनगर, जुना गांव, किसननगर, भटवाडी, श्रीनगर, शांतीनगर, रुपादेवी पाडा, ज्ञानेश्वरनगर परिसर, किसननगर नं. ३ परिसर, काकडे चाळ, कांदबरी सोसायटी, लोकदर्शन सोसायटी, परेरानगर, सुदर्शन कॉलनी परिसर, आझादनगर, गोकुळनगर, जेलटाकी परिसर, पोलीस लाईन, खारकारआळी, जरीमरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, आंबेडकरनगर, गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंतविहार, लोकपुरम, लोकउपवन, देवदयानगर परिसर, कोकणी पाडा, वराडवाडी, शिवाईनगर, गावंडबाग, नीळकंठ, शास्त्रीनगर नं. १ आणि २, लक्ष्मीबाग, विहंगपार्क, मैत्रीपार्क, सिध्दांचल कॉम्प्लेक्स या भागांचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे.

वसंत विहार म्हाडा, वसंतविहार, माजिवडा, मानपाडा, कोठारी कंपाऊंड, ढोकाळी, मनोरमानगर, रुणवाल, डोंगरपाडा, विजयनगर, विजयपार्क, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, वर्तकनगरपरिसर, चिरागनगर, लोकमान्यनगर पाडा नं. १, दोस्ती कॉम्प्लेक्स, वेदांत कॉम्प्लेक्स, कोरस नक्षत्र, रुणवॉल कॉम्प्लेक्स परिसर, लोकमान्नगर पाडा नं. २, शास्त्रीनगर नं. २, आर्य क्रिडा मंडळ, क्रोम पार्क, मोरेवाडी, समतानगर, वर्तकनगर, भीमनगर परिसर, ज्ञानेश्वर नगर, महात्मा फुलेनगर, गंगाधर नगर, वैतीवाडी, सिध्देश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई, मावळीमंडळ, कोलबाड, गोकुळनगर, आझादनगर, खोपट, सिव्हील हॉस्पिटल परिसर, आंबेडकर रोड परिसर, मनोरुग्णालय परिसर, शिवाजीनगर, रघुनाथनगर, डिसोझावाडी, कशीश पार्क, रहेजा गार्डन, ग्रीष्मा सोसायटी, धर्मवीर नगर, परबवाडी, इटर्निटी कॉम्प्लेक्स, विष्णुनगर, भास्कर कॉलनी, ब्राह्मण सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड, साठेवाडी, वागळे एमआयडीसी परिसर, केणीनगर, नेहरुनगर, किसननगर नं. २ या भागांचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे.