ठाणे : टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील दुरस्ती कामासाठी झालेला विलंब, त्यानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा, पिसे बंधाऱ्याजवळ पावसामुळे विद्युत खांब पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाल्याने ठाणे शहराच्या पाणीपुरवठा विस्कळीत झाला. ठाणे, घोडबंदर रोड, वागळे इस्टेटसह शहरातील अनेक भागांत अपुरा पाणीपुरवठा सुरू असून नागरिकांना सहा दिवसांपासून टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याच वेळी टँकर उपलब्ध होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
दरम्यान, तात्पुरती विद्युत व्यवस्था उभारून गुरुवार दुपारपासून पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्याचे काम सुरू केल्याचा दावा ठाणे महापालिका प्रशासनाने केला.पालिकेच्या टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात अमृत २.० योजनेंतर्गत वाढीव क्षमतेची पाणी उपसा करणारे यंत्र बसविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या कामासाठी शनिवार, २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते रविवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे जाहीर करण्यात आले होते.
नागरिकांना त्यापूर्वीच पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहनही पालिकेने केले होते. मात्र, निर्धारित २४ तासांच्या कालावधीत काम पूर्ण झाले नाही. कामाला सुमारे दोन तासांचा विलंब झाला. त्यानंतर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, सुरुवातीला कमी दाबाने पाणी सोडण्यात आल्याने शहरातील पुढील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले.रविवारी झालेल्या विलंबाची झळ सोमवारीही अनेक भागांना बसली. टेमघरनंतर पिसे बंधाऱ्याजवळील वीज खंडित झाल्याने अडचणींत आणखी भर पडली. भातसा नदीच्या पात्रावरील पिसे बंधाऱ्याजवळ वादळी वाऱ्यामुळे दलदलीतील विद्युत खांब कोसळले. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित झाला. बुधवारी सहा तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने बंधाऱ्यातून होणाऱ्या पाणीउपशावर परिणाम झाला. त्यामुळे शहरातील, विशेषतः घोडबंदर परिसरात पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
घोडबंदर रोड, वागळे इस्टेट व परिसरातील काही भागांत कमी दाबाने, तर काही ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना दैनंदिन वापरासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागवावे लागले. परंतु, वाढलेल्या मागणीमुळे अनेक संकुलांना टँकरही मिळाले नाहीत, अशी माहिती नागरिकांनी दिली. गुरुवारी ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिसे बंधारा परिसराची पाहणी केली. टोरंट कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्पुरती विद्युत व्यवस्था उभारण्यात आली व वीजपुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
‘टप्प्याटप्प्याने पुरवठा सुरू’वादळी वाऱ्यामुळे दलदल भागातील विद्युत खांब कोसळले. आता त्या ठिकाणी कायमस्वरूपी विद्युत व्यवस्था उभारण्याच्या सूचना टोरंटच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. गुरुवारपासून पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे नगर-उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.
