२६ जानेवारी रोजी एकीकडे संपूर्ण देशात भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला गेला तर दुसरीकडे ठाण्यातील एका घटनेने या कार्यक्रमाला गालबोट लागले. ही घटना ठाण्यातील कोलशेत भागात असलेल्या लोढा अमारा या उच्चभ्रू सोसायटीत घडली. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी भारतमातेच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येथील रहिवासी्यांनी एकत्र येत हा कार्यक्रम आयोजित केला होता परंतु याचवेळी तेथेच राहणाऱ्या एका महिलेने भारतमातेचा फोटो हिसकावून घेतला व मोठा हंगामा केला.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कॉम्प्लेक्सच्या सुरक्षारक्षकांना पाचारण करण्यात आले. परंतु सदर महिलेने हिसकावून घेतलेला फोटो देण्यास नकार दिला. एका महिला सुरक्षा कर्मचारीने फोटो हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताच सदर महिलेने तिच्यावर जोरदार हल्ला करत तिला मारहाण केली. तिला अडविणाऱ्या अनेक पुरुष सुरक्षारक्षकांना देखील सदर महिलेने मारहाण करत चित्रीकरण करणाऱ्यांचे मोबाईलही फोडले.




परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कापूरबावडी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी सदर महिलेवर गुन्हा दाखल केला असून तिच्यावर याआधी गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. सदर महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे काहींनी सांगितले आहे.