ठाणे – दिवाळीच्या सणात फराळाच्या पदार्थांना असलेली मागणी महिला बचत गटांसाठी रोजगाराचे साधन ठरत आहे. महिला विकास परिवार गृहउद्योगाच्या माध्यमातून शहरातील २०० हून अधिक बचत गटांनी तयार केलेल्या फराळाची नऊ विक्री केंद्रांतून विक्री केली जात आहे. या दिवाळी फराळाला ठाणेकरांची पसंती मिळत असल्याने या व्यवसायातून दरवर्षी सुमारे २० लाख रुपयांची उलाढाल होत असून, ३०० ते ३५० महिलांना रोजगार मिळत आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून महिला विकास परिवार गृहउद्योगाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे. याचे व्यवस्थापन महिला विकास परिवाराचे पंढरीनाथ पवार हे करतात. यंदाही ठाणे शहरात दिवाळी फराळ विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या उपक्रमात २०० हून अधिक महिला बचत गट सहभागी झाले आहेत. महिलांनी घरगुती पद्धतीने तयार केलेल्या चकली, चिवडा, लाडू, करंजी यांसह विविध फराळाच्या पदार्थांना ग्राहकांकडून मागणी मिळत आहे.
दिवाळीच्या धावपळीत अनेकांना घरी फराळ बनविणे शक्य होत नाही. अशा ग्राहकांना स्वस्त दरात दर्जेदार आणि घरगुती फराळ उपलब्ध करून देण्याबरोबरच महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यंदा शहरातील विविध भागांत नऊ विक्री स्टॉल उभारण्यात आले आहेत. विष्णुनगर, नौपाडा, लेकशोर मॉल, ब्रह्मांड, माजिवडा, एव्हरेस्ट वर्ल्ड कोलशेत रोड, ब्लॉसम इंग्रजी शाळा, टीजेएसबी बँक खोपट, वृंदावन बस डेपो, आकाशगंगा आणि एदलजी रोड चरई या ठिकाणी फराळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. या विक्री केंद्राचे उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, कमल केळकर, माजी उपमहापौर सुभाष काळे, नगरसेविका प्रतिभा मढवी आदी उपस्थित होते.
महिलांनी तयार केलेल्या फराळाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी या उपक्रमातून मिळत आहे. त्यामुळे महिलांना केवळ दिवाळीपुरता रोजगार न मिळता त्यांच्या गृहउद्योगाला ओळख आणि बाजारपेठही मिळत आहे. महिला विकास परिवार गृहउद्योगाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या घरगुती दिवाळी फराळाच्या विक्रीतून दरवर्षी सुमारे १८ ते २० लाख रुपयांची उलाढाल होत आहे. नऊ स्टॉलच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे साडेचार हजार किलो फराळाची विक्री केली जाते. या उपक्रमामुळे ३०० ते ३५० महिलांना रोजगाराची संधी मिळत असून, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला हातभार लागत आहे.
