ठाणे – दिवाळी या सणानिमित्त शहरातील उभारी गतीमंद मुलांची कार्यशाळा आणि मुरबाड येथील अवनि मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय तसेच कार्यशाळा या संस्थांच्यावतीने विविध उत्पादने तयार करण्यात आली आहेत. या दोन्ही संस्थांतील विशेष मुलांनी मेहनतीने आणि सर्जनशीलतेने यंदा दिवाळीसाठी विविध सुगंधी आणि आकर्षक वस्तू तयार केलेल्या आहेत. या विशेष मुलांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करून त्यांना स्वावलंबी होण्यासाठी मदत करावी असे आवाहन संस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

‘अवनि चारिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून मागील १८ वर्षांपासून मुरबाड तालुक्यातील माळ भागात मतिमंद मुलांसाठी निवासी विद्यालय तसेच कार्यशाळा चालवली जाते. संस्थेला शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान मिळत नसून, केवळ समाजातील संवेदनशील नागरिकांच्या सहकार्याने हे कार्य चालते. या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक आणि शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक मेहनत घेऊन वर्षभर कार्यशाळेतून अनेक उपयुक्त दिवाळी वस्तू तयार केल्या आहेत. यामध्ये पणत्या, रांगोळी, आयुर्वेदिक सुगंधी उटणे, सुगंधी मेणबत्त्या, उटणे, साबण, मुलतानीमाती साबण, साजूक तुपाच्यावाती, अगरबत्ती या वस्तूंचा समावेश आहे. या वस्तू १० रूपयांपासून ७५ रूपयांपर्यंत विक्री केल्या जात आहेत.

यामध्ये पणतीची एक जोडी ५० रूपयांना तसेच रांगोळी १० रूपये, आयुर्वेदिक सुगंधी उटणे ५० रूपये, सुगंधी साबण ७५ रूपये, मुलतानीमाती साबण ७५ रूपये, साजूक तुपाच्यावाती ५० रूपये, सुगंधी अगरबत्ती ४० रूपयांनी विक्री केले जात आहे. त्याचबरोबर यात सुगंधी उटणे, रांगोळी, मोत्यांचे ४ नग पणत्या असे एकत्रित पॅकेट तयार करण्यात आले आहे. हे पॅकेट २०० रूपयांना विकले जात आहे. या वस्तू खरेदी करून मुलांना स्वावलंबी होण्यासाठी मदत करा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८६९९८२९०४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

त्याचप्रमाणे ठाण्यातील ‘उभारी’ गतिमंद मुलांची कार्यशाळा येथील मुला-मुलींनी देखील या दिवाळीत विक्रीसाठी आकर्षक दिवे, सजावटीच्या पणत्या, सुगंधी उटणे, उदबत्ती आणि रांगोळी अशा अनेक वस्तू तयार केलेल्या आहेत. समाजातील प्रत्येकाने या उत्पादनांची खरेदी करून या मुलांच्या कर्तबाला आणि आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संस्थेच्या प्रतिनिधी जयश्री भोगटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९९८७२६७२९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.