ठाणे : यशोधन नगर भागात मंगळवारी सायंकाळी वृक्ष अंगावर पडून दृष्टी कदम (२५) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दृष्टी कदम या वागळे इस्टेटमधील शिवाजीनगर परिसरात वास्तव्यास आहेत. मंगळवारी सायंकाळी ६.३०

वाजण्याच्या सुमारास त्या यशोधन नगर परिसरात आल्या होत्या. यशोधन नगर रुग्णालयासमोरील रस्त्यावरून पायी जात असताना अचानक एक मोठा वृक्ष उन्मळून त्यांच्या अंगावर कोसळला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी दृष्टी कदम यांना वृक्षाखालून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना त्वरित ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली.

दरम्यान, उन्मळून पडलेला वृक्ष रस्त्यालगत उभी असलेल्या एका कारवरही कोसळल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वृक्ष रस्त्यावर पडल्यामुळे काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने वृक्षाचे तुकडे करून तो रस्त्यावरून हटविला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. सोमवारी तीन हात नाका परिसरातही एका व्यक्तीच्या अंगावर वृक्ष पडून तो जखमी झाला होता.