Viral Video Leopard Yeoor Air Force Station: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या ठाणे शहरातील येऊरच्या डोंगरावरील हवाई दल (एअरफोर्स) स्थानकाच्या परिसरात बिबट्या आढळून आला आहे. या बिबट्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून हा व्हिडीओ नेमका कधी काढण्यात आला आहे, यावषियी अद्याप समजू शकलेले नाही. असे असले तरी, या भागात नागरिक सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत फेरफटका मारण्यासाठी जात असून व्हायरल व्हिडीओमुळे या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

ठाणे शहराच्या एका बाजुला खाडी किनारा तर, दुसऱ्या बाजुला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग येतो. या उद्यानाचा भाग असलेल्या येऊर परिसरात बंगले, हाॅटेल आहेत. यामुळे येथे नागरिकांची ये-जा सुरू असते. परंतु रात्रीच्या पार्ट्यांदरम्यान होणारे ध्वनी प्रदुषण आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे वन्यजीवांवर परिणाम होतो. यावरून वनविभागावर सातत्याने टिका होते. याशिवाय, अनेक नागरिक येऊर परिसरात सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत फेरफटका मारण्यासाठी जातात. या भागात खुली व्यायामशाळा असून येथे अनेक नागरीक सकाळ आणि सायंकाळी व्यायामही करतात.

दरम्यान, याच परिसरात हवाई दलाचे स्थानक असून त्याठिकाणी बिबट्याचा वावर दिसून आला आहे. हा परिसर वन क्षेत्रात येत असला तरी, याठिकाणी नागरिकांही फेरफटका मारण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. ठाणे शहरातही यापुर्वी बिबट्या आढळून आला होता. येऊर हे तर वन क्षेत्रात असल्यामुळे येथे बिबट्यांचा वावर आधीपासूनच आहे. मात्र, येऊरच्या रस्त्यांलगत बिबटे यापुर्वी आढळू आले नव्हते. आता रस्त्यालगत बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

ठाणे शहरातील येऊरच्या डोंगरावरील हवाई दल (एअरफोर्स) स्थानकाच्या परिसरात बिबट्या आढळून आला आहे. या भागातून जात असलेल्या एका वाहनचालकाने या बिबट्याचे मोबाईलमध्ये चित्रित केला असून या चित्रीकरणामध्ये बिबट्या तेथून पळून गेल्याचे दिसून येत आहे. या बिबट्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून हा व्हिडीओ नेमका कधी काढण्यात आला आहे, यावषियी अद्याप समजू शकलेले नाही. असे असले तरी, हा परिसर वन क्षेत्रात येत असून या भागात बिबट्याचा वावर दिसून आलेला आहे, असे वनविभागाने स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि सर्तक रहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.