ठाणे : येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर जंगलाच्या बाहेरील भागात माकडाला बाण लागून माकड जखमी झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. हा बाण माकडाच्या गळ्यातून आर-पार निघून गेला होता. शुक्रवारी अशाच प्रकारे या भागात एक माकड बाण लागून जखमी झाले होते. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे या भागात धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र सुरु आहे का, असा संशय प्राणी प्रेमींकडून व्यक्त केला जात आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर वन परिक्षेत्रात माकडे आहेत. ही माकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरच्या जंगल परिसराजवळील क्षेत्रातील झाडांवर बसलेली असतात. येऊर जंगलाजवळील भागात मोठ्याप्रमाणात बेकायदा बांधकामे तयार झाली आहेत. त्यामुळे जंगलातील वन्यजीवांच्या अधीवासावर त्याचा परिणाम होतो. रविवारी येऊर जंगलालगतच्या भागात एका माकडाच्या गळ्यातून आर-पार बाण गेल्याचे आढळून आले. माकड जखमी अवस्थेत आढळून आल्यानंतर वन विभाग आणि प्राणी प्रेमी संघटनांकडून त्याला वाचविण्याचे प्रयत्न सुरु होते.
शुक्रवारी देखील असाच प्रकार या भागात उघडकीस आला होता. या घटनेत एका माकडाच्या पायाला बाण लागल्याने त्याला दुखापत झाली होती. त्याच्या देखील पायातून बाण आर-पार गेला होता. वारंवार होणाऱ्या या घटनेमुळे या भागात धुनर्विद्या प्रशिक्षण केंद्र सुरु आहे का, असा प्रश्न पर्यावरणवाद्यांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच प्राण्यांना बाण मारुन जखमी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
याविषयी येऊर परिक्षेत्रातील गतविधींवर कारवाई संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कार्यकारी सदस्य रोहित जोशी यांनी माकड जखमी झाल्याने या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती. हे एक अमानुष कृत्य आहे आणि आमच्या संरक्षित जंगलांतील वन्यजीवांवर थेट हल्ला आहे. ज्याने कोणी हे कृत्य केले असेल त्याला शोधून दंडित करणारच, इतकेच नाही तर समितीतील सर्व भागधारक, वन विभाग, ठाणे महापालिका, ठाणे पोलीस , स्थानिकांच्या सहकार्याने येथील सर्व बेकायदेशीर आस्थापनाना आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
या प्रकरणी एक तातडीची बैठक बोलावण्यात आली असून ठाणे महापालिका, पोलीस विभाग, स्थानिक आदिवासी समुदाय आणि प्राणी बचाव व कल्याण स्वयंसेवी संस्थांचे सदस्य उपस्थित असतील. या बैठकीत येऊर संवेदनशील क्षेत्रामधील सर्व बेकायदेशीरपणे कार्यरत आस्थापनांना त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी एक सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यावर चर्चा केली जाईल असे जोशी म्हणाले.
याव्यतिरिक्त, तपासामध्ये संवेदनशील क्षेत्राच्या सीमेवर असलेल्या खासगी बंगले आणि मालमत्तांची देखील चौकशी केली जाईल. असा संशय आहे की, माकडाला त्यांच्या फार्म किंवा बंगल्यात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी मारण्यात आले असावे. या आस्थापनांवर देखील समितीची नजर असेल, जेणेकरून ते अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी नाहीत किंवा त्यांना प्रोत्साहन देत नाहीत याची खात्री करता येईल.
येऊरच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांचे, तसेच येथील वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी निसर्गप्रेमी ठाणेकरांच्या सहभाग अत्यंत आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले.
