ठाणे : ठाण्याच्या इंदिरा नगर भागात राहणाऱ्या एका गोरगरीब घरातील तरुणाला सोशल मीडियावर फेक आयडी तयार केल्याच्या केवळ संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला पोलिस कोठडीत बेदम मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी संताप व्यक्त करत कायद्याचे राज्य उरलेय का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
सोशल मीडियावर फेक आयडी तयार केल्याच्या केवळ संशयावरून ठाण्याच्या इंदिरा नगरमधील एका गोरगरीब घरातील निरपराध तरुणाला पोलिसांनी उचलून नेले आणि त्याला कोठडीत बेदम मारहाण केली,” असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या तरुणाविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसताना, केवळ संशयाच्या आधारावर त्याच्यावर अमानुषपणे पोलिसांकडून अत्याचार झाला, हे धक्कादायक आहे, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. “केवळ संशयावरून एखाद्याला ताब्यात घेऊन मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कुणी दिला? हे कायद्याच्या राज्याला धरून आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ब्रिटिश राजवटीत जसे लोकांवर अन्याय आणि अत्याचार केले जायचे, तशीच परिस्थिती सध्याच्या महाराष्ट्रात पुन्हा निर्माण झाली आहे, असेही आव्हाड म्हणाले. “आज जर एखादी व्यक्ती सत्ताधाऱ्यांच्या राजकीय विचारधारेशी सहमत नसेल, तर त्याला पोलिसांकरवी चोप देण्याची नवी पद्धत राबवली जात आहे. हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे,” अशी टीका त्यांनी केली.
“भारतीय न्यायव्यवस्था सांगते की, एक गुन्हेगार सुटला तरी चालेल, पण शंभर निरपराधांना शिक्षा होता कामा नये, अशी कार्यपद्धती भारतीय न्यायव्यवस्थेत आहे. मात्र, येथे निरपराध माणसालाच ठोकून काढण्याचे आदेश दिले जात आहेत की काय, अशी शंका येऊ लागली आहे. त्या गोरगरीब घरातील पोराचा जर पोलीस कोठडीत डांबून छळ केला जात असेल तर या देशात कायद्याचे राज्य आहे, असे म्हणता येईल का? ” असा गंभीर सवाल आव्हाड यांनी विचारला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलिसांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
