कॉलेजचे कट्टे असोत, वा कॅन्टिन सध्या तरुणांचे घोळके व्हॅलेंटाईन याच विषयाची चर्चा करण्यात मग्न आहेत. त्याचे बेत आखू लागले आहेत. शहरातील मॉल्स, हॉटेल, इव्हेन्ट मॅनेजमेंट संस्था आणि तरुणांचे ग्रुप सगळ्यांनी १४ फेब्रुवारीचे नियोजन केले असून ठाण्यात वेगवेगळ्या माध्यमातून ते तरुणांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्हॅलेन्टाईनसाठी सज्ज झालेल्या ठाण्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आणि नियोजनांचा हा वेध..
माऊंट ट्रेक इंडिया..
निसर्गाने सजलेले माथेरान हे तरुणाईचे आवडीचे ठिकाण असून माथेरानला व्हॅलेन्टाईन साजरा करण्यासाठी मोठय़ा संख्येने तरुणाई दाखल होत असते. त्यामुळे या भागात गर्दी वाढते. काही मंडळींनी माथेरानच्या डोंगरावर पायी जाण्याचा निर्णय घेतला आहे. माऊंट ट्रेक इंडियाच्यावतीने या ट्रेकचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सहभागी होऊन निसर्गाचा अनुभव तरुणांना घेता येणार आहे. भिवपुरी स्थानकातून १३ फेब्रुवारी रोजी हा ट्रेक सुरू होणार असून, त्या माध्यमातून निसर्गाचा अनुभव आपल्या प्रिय व्यक्तीसोबत घेण्याची संधी या ट्रेकच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
निर्वाला रिव्हर रिट्रीट..
व्हॅलेन्टाईनच्या निमित्ताने काहीतरी साहस करण्याची आवड असलेल्यांसाठी निर्वाला रिव्हर रिट्रीट या संस्थेच्यावतीने एका खास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये जोडप्यांना तंबूमध्ये राहण्याचा अनुभव घेता येईल. मिडनाइट डीनर, सोबत संगीताचा आविष्कार अशा गोष्टी देण्याचा प्रयत्न या संस्थेने केला आहे. शहापूरजवळच ५ ते २० फेब्रुवारीदरम्यान हे शिबीर भरवले जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे पवन म्हस्के यांनी दिली.
येऊरच्या परिसरात व्हॅलेन्टाईन..
ठाण्यापासून दूर राहू न शकणाऱ्या मंडळींसाठी येऊर हा निसर्गाचा एक चांगला पर्याय उपलब्ध असून, या भागातील काही हॉटेल्समध्ये व्हॅलेन्टाईन स्पेशल पार्टीचे आयोजन करण्यात आले आहेत. अनेक संस्थांनी अशा पार्टीजचे आयोजन केले असून काही हॉटल्स आणि रिसॉर्टनीसुद्धा अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र वन विभागाचे कायदे मोडणार नाहीत याची काळजी घेऊन इथे पार्टी करण्यास काहीच हरकत नाही.

ठाण्यातील व्हॅलेन्टाईन संध्याकाळ..
ठाण्यातील वेगवेगळ्या हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये व्हॅलेन्टाईन सेलिब्रेशनचे आयोजन केले जाणार आहे. घोडबंदर परिसरातील अनेक क्लब आणि रिसॉर्ट्स याबाबतीत अग्रेसर आहेत. घोडबंदर रोडवरील हॉटेल अ‍ॅब्रॉयसियामध्ये व्हॅलेन्टाईन इव्हीनिंगचे आयोजन केले आहे. भेटवस्तू, खेळ आणि मंद प्रकाशातील जेवण हे या ठिकाणचे वैशिष्टय़ असणार आहे. ओवळा परिसरातील हॉटेल वेल्वेट गार्डनच्यावतीनेही व्हॅलेन्टाईन डेसाठी स्पेशल आयोजन करण्यात आले आहे. या संस्थांच्या फेसबुक पेज आणि वेबसाइटवर त्याची विस्तृत माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. या सगळ्यासाठी नोंदणी आवश्यक आहे.