ठाणे : नोकरीच्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून ३३ वर्षीय तरुणाने शहाड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताचे कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पंकज बडगुजर (३३)असे मृत मुलाचे नाव आहे. तो ठाण्यातील वागळे इस्टेट भागात एका कंपनीत कामाला होता. यापूर्वी तो इतर कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. पंकज याने १९ सप्टेंबर २०२५ पासून नव्याने नोकरी सुरू केली होती. मात्र, काही काळानंतर त्याच्यावर कामाच्या ठिकाणी मानसिक दबाव असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले.

७ नोव्हेंबर २०२५ ला तो घरी आल्यानंतर त्याने वडिलांना मी नोकरी सोडले आहे असे सांगितले होते. मात्र, नोकरी सोडण्याचे कारण त्याने सांगितले नव्हते. यानंतर पंकज काही दिवस एका कंपनीत कंत्राटी पद्धतीने कामावर गेला. १३ डिसेंबर २०२५ ला कंपनीचे ओळखपत्र जमा करण्यासाठी तो कंपनीत गेला होता. घरी परतल्यानंतर तो तणावात असल्याचे वडिलांच्या लक्षात आले. रात्री जेवणानंतर तो बाहेर जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला; मात्र तो परतला नाही.

दुसऱ्या दिवशी पंकजच्या वडिलांनी याप्रकरणी उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावेळी कल्याण लोहमार्ग पोलिसांना रेल्वे रुळावर पंकज याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाची नोंद कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात झाली होती.

पंकज हा आत्महत्या करणार नाही असा विश्वास त्याच्या वडिलांना होता. काही दिवसांनी त्यांनी पंकज याची कागदपत्र तपासली. त्यावेळी त्याच्या वागळे इस्टेट येथील कंपनीतील त्याचा वरिष्ठ मानसिक त्रास देत होता असे आढळून आले. त्यानंतर त्याच्या वडिलांनी २४ जूनला कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.