ठाणे : शासनाच्या विविध योजना, जिल्हा परिषदेची विकासकामे आणि लोकहिताच्या उपक्रमांची अधिकृत व अद्ययावत माहिती नागरिकांपर्यंत जलदगतीने पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद ठाणेने ‘पब्लिक ॲप’ या डिजिटल व्यासपीठावर अधिकृत खाते सुरू केले आहे. या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या विविध विभागांशी संबंधित महत्त्वाची माहिती नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक गतिमान, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
पब्लिक ॲप डाउनलोड करून त्यावरील ठाणे जिल्हा परिषदेच्या खात्यावर विविध शासकीय योजना, विकासकामे, प्रसिद्धीपत्रके, जनजागृती मोहिमा, महत्त्वाच्या सूचना तसेच विविध विभागांच्या उपक्रमांची माहिती नियमितपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, समाजकल्याण, महिला व बालविकास, पाणीपुरवठा, कृषी यांसह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व उपक्रमांची माहिती, निविदा, यशोगाथा तसेच आवश्यकतेनुसार आपत्कालीन परिस्थितीतील महत्त्वाच्या सूचना या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. त्यामुळे शासनाच्या योजनांची माहिती वेळेत मिळण्यासोबतच विविध लोकहिताच्या उपक्रमांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषद ठाणेची सर्व अधिकृत समाजमाध्यमांवरही खाती कार्यरत आहेत. आता पब्लिक ॲपची भर पडल्याने आणखी एक अधिकृत डिजिटल माध्यम उपलब्ध झाले आहे.
तर फसवणुकीला आळा बसेल
अधिकृत डिजिटल माध्यमावरून माहिती उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांना योजनांबाबतची माहिती मिळविताना अप्रमाणित माहिती किंवा अफवांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रसारित होणारी अधिकृत माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम या व्यासपीठाद्वारे केले जाणार आहे. यामुळे नागरिकांची फसवणूक होण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे.
‘अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा’
डिजिटल माध्यमांच्या युगात शासनाची माहिती नागरिकांपर्यंत जलद, अचूक आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहोचणे महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषद ठाणेचे अधिकृत पब्लिक ॲप खाते हे प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वाचे माध्यम ठरेल. शासनाच्या योजना, विकासकामे आणि लोकहिताच्या उपक्रमांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत वेळेत पोहोचावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी अधिकृत पब्लिक ॲप डाउनलोड करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा,” असे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सांगितले.
