ठाणे : क्षयरोगाचे लवकर निदान, वेळेत उपचार आणि व्यापक जनजागृतीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याला क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेकडून ‘जोश’ (JOSH – Joint Squad for Health) पथकांची निर्मिती करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या ‘क्षयमुक्त भारत अभियानाला’ बळ देण्यासाठी युवकांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार असून, गावागावांत आणि वॉर्ड स्तरावर पोहोचून क्षयरोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, तपासणी आणि उपचारांविषयी जनजागृती केली जाणार आहे

ठाणे जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून वेळोवेळी क्षयरोग मुक्तीसाठी विविध अभियान राबविण्यात येतात. याच अंतर्गत क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी केवळ आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांवर अवलंबून न राहता समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘माय भारत’ स्वयंसेवक आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) कॅडेट्सच्या माध्यमातून जनजागृतीची मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक ब्लॉक आणि वॉर्ड स्तरावर ‘माय भारत’चे पाच स्वयंसेवक आणि एनसीसीचे पाच कॅडेट्स अशा दहा सदस्यांचा समावेश असलेले ‘जोश’ पथक तयार केले जाणार आहे. वर्ग-१ दर्जाच्या नोडल अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या पथकांचे नियोजन आणि समन्वय केला जाईल.

घरोघरी जाऊन तपासणी

या पथकांतील सदस्य घरोघरी तसेच गावपातळीवर जाऊन नागरिकांना क्षयरोगाची लक्षणे, त्याचा प्रतिबंध, निदानासाठी उपलब्ध असलेल्या तपासण्या आणि उपचारांचे महत्त्व समजावून सांगतील. क्षयरोगाची लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांना वेळेत तपासणी करून घेण्यासाठी आणि उपचार सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांना समुपदेशन आणि मनोसामाजिक आधार देण्यासह निक्षय मित्रांच्या सहभागातून रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठीही हे पथक प्रयत्न करणार आहे. संशयित रुग्णांना आरोग्य केंद्रांशी जोडण्यात आरोग्य विभागाला क्षेत्रीय स्तरावर सहकार्य करण्याची जबाबदारीही पथकांवर राहणार आहे.

क्षयरुग्णांना समुपदेशन आणि मानसिक आधार

  • ‘जोश’ पथकांच्या कामकाजाचे प्रभावी निरीक्षण करण्यासाठी, दैनंदिन कामाच्या नोंदी ठेवण्यासाठी आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील कामाची माहिती तत्काळ उपलब्ध होण्यासाठी ‘JOSH Mobile App’चा वापर करण्यात येणार आहे. यामुळे जनजागृती मोहिमेचा आढावा घेणे आणि पथकांच्या कामकाजाचा समन्वय साधणे शक्य होणार आहे.
  • युवकांच्या माध्यमातून क्षयरोगाबाबत असलेले गैरसमज दूर करणे, नागरिकांना तपासणीसाठी पुढे आणणे आणि उपचारांविषयी जागरूकता वाढविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी क्षयरोग निर्मूलनासाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
  • ‘जोश’ पथकांच्या माध्यमातून युवक गावागावांत आणि वॉर्ड स्तरावर पोहोचून जनजागृती करतील. संशयित रुग्णांना वेळेत तपासणी व उपचारासाठी प्रवृत्त करण्याबरोबरच क्षयरुग्णांना समुपदेशन आणि मानसिक आधार देण्यातही या पथकांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे त्यांनी सांगितले. ठाणेकरांना आवाहन

ठाणे जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागासह प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, युवक आणि नागरिकांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी केले. क्षयरोग निर्मूलनाच्या सामूहिक प्रतिज्ञेने कार्यक्रमाची सांगता झाली.