ठाणे -पावसाळ्यात सापांचे मानवी वस्तीकडे होणारे स्थलांतर आणि सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. साप दिसल्यास त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न न करता प्रशिक्षित सर्पमित्र अथवा वन विभागाशी संपर्क साधावा, तसेच सर्पदंश झाल्यास कोणतेही घरगुती उपचार न करता तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच वाढलेली आर्द्रता, बिळांमध्ये साचणारे पाणी आणि प्रजननाचा हंगाम यामुळे साप नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडून मानवी वस्त्यांच्या परिसरात येण्याचे प्रमाण वाढते. विशेषतः ग्रामीण भागातील शेतजमिनी, गोठे, अंगणे, झुडपे, लाकडांचे ढीग, कचऱ्याचे साठे आणि पाणथळ भागात सर्पदर्शनाच्या घटना अधिक घडत असल्याचे निरीक्षण आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
साप हा पर्यावरणातील अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक असून उंदरांसारख्या पिकांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे भीतीपोटी सापाला मारणे हा उपाय नसून, त्याला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडण्यासाठी प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाची मदत घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सर्पदर्शन टाळण्यासाठी घर व परिसर स्वच्छ ठेवणे, झुडपे, कचरा व लाकडांचे ढीग हटविणे, उंदरांचे प्रमाण कमी ठेवणे, रात्री बाहेर पडताना टॉर्चचा वापर करणे, घराबाहेर ठेवलेले बूट-चप्पल वापरण्यापूर्वी तपासणे आणि शेतात काम करताना बूट व संरक्षणात्मक साधनांचा वापर करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जमिनीवर झोपण्याऐवजी पलंगावर झोपण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. साप दिसल्यास घाबरून आरडाओरडा करणे, दगड मारणे, काठीने हाणणे किंवा पकडण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते. अशा वेळी किमान आठ ते दहा फूट अंतर राखून सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाला तात्काळ माहिती द्यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे.
सर्पदंश झाल्यास कोणतेही घरगुती उपचार, जखम कापणे, विष शोषण्याचा प्रयत्न करणे किंवा घट्ट बांधणे टाळावे. रुग्णाला शांत ठेवून तात्काळ जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करावे. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सर्पदंशावरील उपचार व आवश्यक प्रतिविष (Anti Snake Venom) उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली आहे.
पावसाळ्यात सर्पदर्शनाच्या घटना वाढतात. नागरिकांनी अफवा आणि भीतीला बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा. साप दिसल्यास त्याला इजा न करता प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा. सर्पदंश झाल्यास त्वरित शासकीय आरोग्य संस्थेत उपचार घेणे हेच सर्वात प्रभावी व सुरक्षित पाऊल आहे.- रणजित यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
