ठाणे – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) व्यवस्थापन अधिक पारदर्शक, गतिमान आणि कर्मचारी-केंद्रित करण्याच्या दिशेने ठाणे जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. अर्थ विभागामार्फत वापरण्यात येणारी भविष्य निर्वाह निधीची संगणकीकृत प्रणाली अद्ययावत करण्यात आली असून ती आता पूर्णपणे ‘मोबाईल फ्रेंडली वेब-बेस्ड’ स्वरूपात कार्यरत झाली आहे. या नव्या सुविधेमुळे जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या ३ हजार ४६१ कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्याची माहिती आता काही क्षणांत मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.

जिल्हा परिषद ठाणेने भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापनाच्या संगणकीकरणाची सुरुवात सन २००९-१० मध्ये सर्व्हर बेस्ड सॉफ्टवेअरद्वारे केली होती. त्यानंतर २०१८-१९ मध्ये ही प्रणाली वेब-बेस्ड करण्यात आली. आता २०२५-२६ मध्ये अत्याधुनिक तांत्रिक सुधारणा करून ती अधिक सुरक्षित, आधुनिक आणि वापरकर्ता-अनुकूल बनविण्यात आली आहे. या बदलामुळे कर्मचारी कोणत्याही ठिकाणाहून आणि कोणत्याही वेळी आपल्या पीएफ खात्याची अद्ययावत माहिती सहज पाहू शकतात. कर्मचाऱ्यांच्या मासिक वर्गणीची नोंद, निधीतील व्यवहार, व्याज परिगणना, वार्षिक लेखे तयार करणे तसेच खात्यांशी संबंधित विविध प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल माध्यमातून पार पाडल्या जात आहेत. त्यामुळे केवळ कामकाजाची गती वाढली नसून आर्थिक व्यवहारांमधील पारदर्शकताही अधिक बळकट झाली आहे.

नव्या प्रणालीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती थेट कर्मचाऱ्यांच्या मोबाईलशी जोडण्यात आली आहे. त्यामुळे सन २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीतील भविष्य निर्वाह निधी लेखे मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यापूर्वी वित्त विभागाकडून छापील विवरणपत्रांचे वितरण केले जात होते. मात्र आता ही माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाल्याने वेळ, खर्च आणि प्रशासकीय प्रक्रिया यामध्ये मोठी बचत होणार आहे.

प्राथमिक शिक्षकांसाठीही ही प्रणाली अधिक परिणामकारक ठरली आहे. शालार्थ प्रणालीमधून तयार होणारी अनुसूची थेट आयात करून संबंधित शिक्षकांच्या पीएफ खात्यात मासिक वर्गणी जमा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे वर्गणी जमा करण्यासाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला असून कामकाज अधिक अचूक आणि जलद झाले आहे. मुख्यालय तसेच पंचायत समिती स्तरावरील आस्थापना शाखांनाही या प्रणालीचा मोठा लाभ होत आहे. संबंधित कर्मचारी अनुसूचीनुसार थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्गणी जमा करू शकत असल्याने प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी होऊन कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक झाली आहे. याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या खात्यात मासिक वर्गणी जमा होताच त्यांना एसएमएसद्वारे तत्काळ सूचना पाठविण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.

३१ मार्च २०२६ अखेरच्या आकडेवारीनुसार जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत २,६७७ प्राथमिक शिक्षक आणि ७८४ इतर कर्मचारी अशा एकूण ३,४६१ कर्मचाऱ्यांना या संगणकीकृत प्रणालीचा लाभ मिळत आहे. तसेच भविष्य निर्वाह निधीशी संबंधित सर्व माहिती क्लाउड सर्व्हरवर सुरक्षित ठेवण्यात आली असून डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेसाठी अत्याधुनिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सांगितले की, कर्मचारी सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासन अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे सातत्याने प्रयत्नशील आहे. भविष्य निर्वाह निधीची अद्ययावत मोबाईल फ्रेंडली वेब प्रणाली हे त्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सुविधेमुळे कर्मचारी कोणत्याही वेळी आपल्या खात्याची माहिती तपासू शकतात. डिजिटल प्रशासनाच्या माध्यमातून सेवा वितरण अधिक प्रभावी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.