ठाणे – जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील इयत्ता ५ वी ते ८ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी “मिशन भरारी” हा प्रेरणादायी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भारताची अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) तसेच देशातील इतर नामांकित वैज्ञानिक व संशोधन संस्थांना शैक्षणिक भेटी देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेसाठी सुमारे ५० लाखांचा निधी प्रस्तावित करण्यात आला असून, जिल्हा प्रशासनाकडून नियोजन प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनासारख्या क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची ही दुर्मीळ संधी ठरणार आहे.

ठाणे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचे डिजिटलायझेशन, एआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विविध उपायोजना देखील जिल्ह्याच्या शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत आहेत. याच पार्श्ववभूमीवर आता नुक्त्याच्या पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत मिशन भरारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. याल संमती मिळाली असून यासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. याअंतर्गत आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निवडक विद्यार्थ्यांना इस्रो सह देशातील इतर नामांकित वैज्ञानिक व संशोधन संस्थांना शैक्षणिक भेटी देण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन सुरू आहे. विद्यार्थ्यांची निवड, समवेत जाणाऱ्या शिक्षकांची निवड तसेच संबंधित संस्थांच्या तारखा घेणे याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तारखांची निश्चिती झाल्यास लवकरच ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देशभरातील नामांकित वैज्ञानिक संशोधन संस्थांमध्ये भेट देता येणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. उपग्रहांची निर्मिती प्रक्रिया, रॉकेट प्रक्षेपणामागील विज्ञान, अंतराळ मोहिमांचे नियोजन, चांद्र व मंगळ मोहिमांची माहिती, तसेच दैनंदिन जीवनात उपग्रह तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतो याविषयी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. प्रयोगशाळांमध्ये चालणारे संशोधन, अत्याधुनिक उपकरणांचा वापर, डेटा विश्लेषणाची प्रक्रिया आणि वैज्ञानिकांच्या कार्यपद्धती यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांची निवड गुणवत्ता, शैक्षणिक प्रगती, विज्ञान विषयातील आवड या निकषांवर केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक शिक्षकही सहभागी असतील, जेणेकरून परतल्यानंतर त्या अनुभवांचे शाळांमध्ये सादरीकरण करता येईल आणि इतर विद्यार्थ्यांनाही त्यातून प्रेरणा मिळेल. प्रवास, निवास, भोजन आणि सुरक्षिततेची सर्व व्यवस्था प्रशासनामार्फत काटेकोरपणे करण्यात येणार आहे. इस्रोकडून भेटीच्या तारखा लवकरच निश्चित होण्याची अपेक्षा असून, तारीख मिळताच नियोजित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना संबंधित केंद्रांवर घेऊन जाण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

“मिशन भरारी” हा केवळ एक शैक्षणिक दौरा नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होईल, जिज्ञासा वाढीस लागेल. संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळेल. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या वैज्ञानिक संस्थांचा प्रत्यक्ष परिचय मिळत नाही; त्यामुळे हा अनुभव त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरूशकतो. – बाळासाहेब राक्षे, शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद