ठाणे – जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजातील पारंपरिक कला जपणाऱ्या कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे अर्थार्जन व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या समाजकल्याण विभागाकडून महत्त्वाची योजना राबविण्यात येत आहे.
भजन मंडळी, कीर्तन मंडळे तसेच गाण्याचा वाद्यवृंद समूह चालविणाऱ्या कलाकारांना आवश्यक असलेली वाद्यसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून यासाठी सुमारे १ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील अनेक कलावंतांना त्यांच्या कलेला नवे व्यासपीठ मिळण्याबरोबरच आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात ग्रामीण तसेच शहरी भागात भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक संगीत सादरीकरणाची समृद्ध परंपरा आहे. अनेक ठिकाणी भजन मंडळी आणि वाद्यवृंद समूह धार्मिक, लग्न सोहळे तसेच सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय असतात. मात्र आवश्यक वाद्यसामग्री खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणी येत असल्यामुळे अनेक मंडळींना आपल्या कलेचा विस्तार करता येत नाही आणि रोजगार देखील उपलब्ध होत नाही. ही बाब लक्षात घेऊन समाजकल्याण विभागाने मागासवर्गीय समाजातील नागरिकांना थेट मदत मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कलाकारांचा समूह असणे आवश्यक असून भजन मंडळी किंवा वाद्यवृंद समूहाच्या स्वरूपात कार्यरत असणे गरजेचे आहे. इच्छुक समूहांनी समाजकल्याण विभागाकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र मंडळांची निवड करण्यात येणार असून त्यानंतर निवड झालेल्या समूहांना वाद्यसामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे मागासवर्गीय समाजातील नागरिकांना त्यांच्या कलेच्या माध्यमातून स्वावलंबी बनवणे हा आहे. भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध धार्मिक सोहळ्यांमध्ये सादरीकरण करून कलाकारांना उत्पन्नाचे साधन मिळावे, तसेच पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारसा जतन व्हावा, यासाठी प्रशासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
समाजकल्याण विभागाच्या या योजनेमुळे जिल्ह्यातील अनेक भजन मंडळी आणि वाद्यवृंद समूहांना मोठा दिलासा मिळणार आहे. आवश्यक वाद्यसामग्री उपलब्ध झाल्यास अनेक मंडळींना आपले सादरीकरण अधिक प्रभावीपणे करता येईल आणि नव्या संधी निर्माण होतील.
या योजनेच्या माध्यमातून पात्र भजन मंडळी आणि वाद्यवृंद समूहांना तबला, मृदुंग, ढोलकी, हार्मोनियम, वीणा, बासरी, डफ, झांज, टाळ, बँजो समूह संच, डिस्को जॉकी, यांसारखी विविध पारंपरिक वाद्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या वाद्यांमुळे कलाकारांना आपले सादरीकरण अधिक प्रभावीपणे करता येणार असून सांस्कृतिक कार्यक्रमांची गुणवत्ता वाढण्यास देखील मदत होणार आहे. तसेच नव्या पिढीतील तरुणांनाही या पारंपरिक कलेशी जोडले जाण्याची संधी मिळेल.
मागासवर्गीय समाजातील नागरिकांना त्यांच्या कलेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांना विविध वाद्य दिली जाणार आहेत. – उज्वला सोनवणे – सपकाळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे</strong>.
