ठाणे : महाराष्ट्र १०० दिवस कृत्ती आरखड्याअंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळावा तसेच त्यांच्या तक्रारींचे निवारण सहज सोप्या पद्धतीने व्हावे यासाठी ‘व्हॉटसअॅप चॅटबोट’ ही सेवा सुरु केली. या सेवेला ग्रामीण भागातील नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून या व्हॉट्सॲप चॅटबोटद्वारे घरपोच दाखले योजना घरोघरी पोहोचली आहे. या योजनेच्या माध्यमातून गेल्या दीड महिन्यात एकूण ५ हजार दाखल्यांचे घरपोच वितरण करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक जन्म दाखल्यांचा समावेश आहे.
ठाणे जिल्हा परिषदेमार्फत नागरिकांना शासकीय सेवा, योजनाआणि माहिती अधिक सोप्या, जलद तसेच सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावी या उद्देशाने ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘व्हॉटसअॅप चॅटबोट’ सुरु केले आहे. या सेवेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कोणत्याही कामासाठी थेट जिल्हा परिषदेशी संवाद साधता येत आहे. या व्हॉटसअप चॅटबोट मध्ये ‘डोअरस्टेप डिलेव्हरी’ म्हणजेच घरपोच दाखले मिळविण्याचे संकेतस्थळ समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना जन्म दाखला, उत्पन्न दाखला, विवाह नोंदणी दाखला किंवा इतर काही दाखले काढायचे असल्यास त्यांनी या व्हॉटसअप चॅटबोट मेसेज केल्यास त्यांना त्या दाखल्या लागणारा अर्ज सहज उपलब्ध होत आहे.
त्यानुसार, गेल्या दीड महिन्यात ५ हजार ५६८ नागरिकांनी विविध दाखल्यांसाठी अर्ज दाखल केले. त्यापैकी ५ हजार १२२ दाखले वितरीत करण्यात आले असून यामध्ये सर्वाधिक म्हणजेच १ हजार १५७ जन्म दाखल्यांचा समावेश आहे. तर, इतर मृत्यू नोंद दाखला, विवाह नोंदणी दाखला, दारिद्रय रेषेखाली असल्याचा दाखला, ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला, नमुना न ८ चा दाखला आणि निराधार असल्या बाबतचा दाखल्यांचे वितरण करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्यामार्फत देण्यात आली.
व्हॉटसअॅप चॅटबोट कसे वापरले जाते ?
नागरिकांना व्हॉटअॅअप चॅटबोटद्वारे जिल्हा परिषदेशी संवाद साधायचा असेल तर, त्यांच्याकडे ८२६३८४१९०७ हा मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे. नागरिकांनी त्यांच्या व्हॉटसअॅप ॲपद्वारे या क्रमांकावर संदेश पाठवायचा आहे. यामध्ये मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषा उपलब्ध असून केवळ काही सोप्या टप्प्यांमध्ये नागरिकांना आवश्यक ती माहिती मिळू शकते. जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध विभागांच्या सेवा, शासकीय योजनांची माहिती, त्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी करावी अशी सर्व माहिती नागरिकांना सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होत आहे.
