फेर‘फटका’ : परिसर स्वच्छ ठेवा आणि करात सूट मिळवा

संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेच्या वतीने ठाणे शहरात ठाणे महापौर परिसर सुशोभीकरण योजना राबविण्यात येणार आहे, या योजनेची माहिती देणारे फलक शहरात लागलेले पाहावयास मिळत आहे. गृहसंकुले आणि झोपडपट्टी या दोन गटांत ही योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी घालून दिलेले नियम पूर्ण करणाऱ्या गृहसंकुलांना मालमत्ता करात ५ टक्के सवलत दिली जाणार आहे, तर झोपडपट्टी विभागात महापालिकेच्या वतीने ५ ते १० लक्षपर्यंतची विकासकामे करण्यात येणार

आहेत. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरावा असा हा उपक्रम महापौर संजय मोरे यांच्या कल्पनेतून राबविण्यात येणार आहे. महापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम ठाणे शहरात स्वच्छता मोहीम राबविणार असल्याचे नमूद केले होते. त्या दृष्टीने त्यांनी हे उचललेले पाऊल स्तुत्य असे आहे. जसे आपले घर तसा आपला परिसर अशी

टॅगलाइन या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली आहे. या मोहिमेत शालेय विद्यार्थी, व्यापारी, ज्ञातिबांधव, सामाजिक, धार्मिक संस्थांनीही यात सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

ठाणेकर प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत असतात, त्याचप्रमाणे याही मोहिमेत सहभागी होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अनेक गृहसंकुलांमध्ये स्पर्धेसाठी जे निकष ठेवण्यात आले आहेत, ते पूर्ण केले जातात. त्यामुळे अशा संस्थांना या स्पर्धेत सहभागी होणे सहज शक्य आहे. परंतु जी संकुले किंवा इमारती हे करत नाहीत त्यांनीही यात पुढाकार घेणे गरजेचे आहे.

संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. ही मोहीम फक्त स्पर्धेपुरताच मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी ठाणेकरांनी करावी जेणेकरून आपले शहर हे नेहमीच स्वच्छ व सुंदर राहील हा यामागचा हेतू आहे.

गृहनिर्माण संस्था गटामध्ये परिसराची साफसफाई (२० गुण), घनकचरा व्यवस्थापन (१५ गुण), वृक्ष लागवड (१० गुण), पाण्याचा सुयोग्य वापर (१० गुण), सौर ऊर्जा वापर (१० गुण), अग्निशमन यंत्रणा अद्ययावतीकरण (१० गुण),

वर्षां जलसंचयन (१० गुण), महापालिका कर नियमित भरणे (५ गुण), आणि मतदार जागृती (१० गुण) असे स्पर्धेचे निकष ठरविण्यात आले आहेत. या स्पर्धेतील निकषांप्रमाणे पात्र ठरणाऱ्या इमारतींना दरवर्षी मालमत्ता करामध्ये ५ टक्के सवलत देण्यात येणार आहे.

झोपडपट्टी गटात परिसर स्वच्छता (३० गुण), कचऱ्याचे वर्गीकरण (२५ गुण), पाण्याचा वापर (१० गुण), गटार व दैनंदिन साफसफाई (१५ गुण), परिसरातील विद्युत व्यवस्था (१० गुण), मतदार जागृती (१० गुण) असे निकष ठरविण्यात आले आहेत. जे झोपडपट्टी विभाग या निकषास पात्र ठरतील त्या विभागामध्ये ५ ते १० लक्ष रुपयांपर्यंतची विकासकामे महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहेत. नुकताच ठाण्यात महापौरांच्या संकल्पनेतून कला क्रीडा महोत्सव साजरा झाला. या महोत्सवातही संपूर्ण ठाणे शहरातील कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली होती. या निमित्ताने का होईना शहरात या महोत्सवाची महिनाभर वातावरणनिर्मिती होती. ठाणेकरही उत्स्फूर्तपणे यात सहभागी झाले होते. तसेच गेल्या वर्षी झालेली ठाणे महापौर वर्षांमॅरेथॉन स्पर्धा ही सर्वसमावेशक अशी झाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thanecity cleaners issue

Next Story
स्वस्त डायलिसिससाठी पालिकेचा पुढाकार
ताज्या बातम्या