scorecardresearch

वाढीव पाण्यापासून ठाणेकर वंचितच; भातसातून उचल देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेकडे प्रलंबितच

ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा व्हावा यासाठी भातसा धरणातून १०० दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेच्या कोटय़ातील २० दशलक्ष लिटर पाणी देण्याच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही.

ठाणे : ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा व्हावा यासाठी भातसा धरणातून १०० दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेच्या कोटय़ातील २० दशलक्ष लिटर पाणी देण्याच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. घोडबंदर परिसरातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर सातत्याने घोषणा करण्यात येत आहेत. मात्र, याबाबत कोणताही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही.
ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, घोडबंदर या पट्टयांची लोकसंख्या २५ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज ४८५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणीपुरवठा कमी पडत असल्यामुळे विशेषत: घोडबंदर, वागळे इस्टेट परिसरात सातत्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी बारवी आणि भातसा धरणांतून प्रत्येकी १०० दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळविण्यासाठी प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. बारवी धरणाची उंची वाढविल्यानंतर या धरणातून शहराला १०० दशलक्ष लिटर पाणी मिळावे असा आग्रह महापालिका प्रशासनाने धरला होता. परंतु वाढीव पाण्याचे नियोजन करताना त्यात ठाणे शहरासाठी पाणी आरक्षित करण्यात आलेले नाही. त्यामुळे वाढीव पाण्यासाठी ठाणे शहराची संपूर्ण मदार आता भातसा धरणावर आहे. या धरणातून शंभर दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळविण्याचा प्रस्ताव पालिकेने जलसंपदा विभागाकडे पाठविला आहे. यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्या वेळेस या विभागाने सकारात्मक प्रतिसाद दाखविला होता. तसेच ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही काही महिन्यांपूर्वी बैठक घेतली होती. त्यांनी भातसातून ठाणे शहराला वाढीव पाणी देण्याच्या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिला होता. प्रत्यक्षात मात्र वाढीव पाण्याचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने ठाणेकर वाढीव पाण्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे. या संदर्भात ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
पंप सुरू पण पाणी नाही
भातसा नदी पात्रावरील पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलण्यासाठी ६०० अश्वशक्ती क्षमतेचे पाच पंप होते. त्यापैकी तीन पंपांद्वारे दररोज २१० दशलक्ष लिटर इतके पाणी उचलण्यात येत होते. तर उर्वरित दोन पंप राखीव ठेवले होते. भातसा धरणातून १०० दशलक्ष लिटर वाढीव पाणी मंजुर झाले तर, या पंपाद्वारे वाढीव पाणी उचलणे शक्य होणार नाही. त्यामुळे पालिकेने ११०० अश्वशक्ती क्षमतेचे पाच पंप बसविण्याचा निर्णय घेऊन त्यातील चार पंप बसवून ते कार्यान्वित केले आहेत. उर्वरित एक पंप बसविण्याचे काम सुरू आहे. पंप कार्यान्वित झाले असले तरी वाढीव पाणी अद्याप मंजूर झालेले नाही.
पत्र बेदखल?
ठाणे शहरातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी मुंबई महापालिकेकडे २० दशलक्ष लिटर वाढीव पाणी देण्याची मागणी करण्यात आली असून यासंबंधीचे पत्र महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी मुंबई महापालिकेला तीन महिन्यांपूर्वी पाठिवले आहे. माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केलेल्या मागणीच्या आधारे हे पत्र पाठविण्यात आले होते. या पाण्याचे कोपरी, आनंदनगर भागासाठी ६ दशलक्षलीटर, वागळे इस्टेट विभागासाठी ११ दशलक्ष लिटर आणि किसननगर, भटवाडी भागासाठी ३ दशलक्ष लिटर याप्रमाणे नियोजन करण्यात येणार आहे. पंरतु या मागणीबाबतही अद्याप काहीच निर्णय झालेला नसल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thanekar deprived surplus water decision lift from bhatsa pending mumbai municipal corporation amy

ताज्या बातम्या