scorecardresearch

लतास्वरांना अविस्मरणीय आदरांजली ; ‘लोकसत्ता अभिजात’ उपक्रमांतर्गत संगीतसंध्येला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांची उस्फूर्त दाद मिळाली.

ठाणे : ज्या स्वरांनी कित्येक पिढय़ांत संगीताचा कान तयार केला, त्या गानप्रतिभेला तिच्या सर्वोत्तम गीतांचा नजराणा बहाल करत आदरांजली वाहणारी एक अपूर्व संध्या रसिकांना गुरुवारी अनुभवायला मिळाली. ‘लोकसत्ता’ अभिजात उपक्रमाअंतर्गत आयोजित ‘लता:एक आठवण’ या मैफलीमध्ये आजच्या पिढीतील गानतपस्वींनी लता मंगेशकर यांच्या हिंदी, मराठी आणि रागदारीवरील गीतांचा आविष्कार घडविला. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांची उस्फूर्त दाद मिळाली.

लतादीदींच्या स्वरांची मोहिनी अभंगांतून, भावगीतांतून, हिंदी चित्रगीतांमधून श्रोत्यांवर सारखीच पडते. बेला शेंडे, केतकी भावे-जोशी, संजीवनी भेलांडे, संपदा गोस्वामी आदींनी लतादीदींच्या वैविध्यपूर्ण स्वरछटा असलेली गीते निवडून श्रोत्यांना खिळवून ठेवले.

कार्यक्रमाची सुरुवात केतकी भावे-जोशी यांनी  ‘भेटी लागे जीवा’ या अभंगाद्वारे केली. यानंतर श्रावणात घन निळा आणि रंगिला या गाण्याचे त्यांनी सादरीकरण केले. यानंतर संपदा गोस्वामी यांनी ‘लग जा गले के फीर’ या गीतांतील भावस्वर अचूक पकडला. गायिका संजीवनी भेलांडे यांनी ‘ज्योती कलश झलके’, ‘रात भी है कूछ भिगी भिगी’ या अनवट गीतांना सादर करीत श्रोत्यांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या असलेल्या गायिका बेला शेंडे यांनी  लतादीदींची हिंदी, मराठीतील पाच गाणी सादर करून मैफलीची कमान उंचावत नेली.  सूत्रसंचालन संदीप पंचवटकर आणि कुणाल रेगे यांनी केले.

प्रस्तुती :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

सहप्रायोजक : सिडको, टीजेएसबी सहकारी बँक लि.

पॉवर्ड बाय : नेटभेट ईलर्निग सोल्युशन्स

बँकिंग पार्टनर्स : ठाणे भारत सहकारी बँक लि.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thanekar huge response to music concert under loksatta abhijat initiative zws

ताज्या बातम्या