ठाणे : घरात श्वान पाळताना त्याची नोंद ठाणे महापालिकेत करून त्याचा परवाना मिळविणे गरजेचे असते. ठाणे शहरात जेमतेम साडेचार हजार इतक्याच पाळीव श्वानांची नोंदणी झाली आहे. शहरात पाळीव श्वानांचे प्रमाण यापेक्षा किती तरी अधिक असण्याची शक्यता असल्याने महापालिकेने गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळय़ा गृहसंकुलांमध्ये यासंबंधीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे महापालिकेने श्वान पाळण्याकरिता नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसार ठाणे महापालिकेच्या हद्दीतील श्वानमालकांना श्वानाचा परवाना मिळविणे आवश्यक आहे. असे असले तरी महापालिकेच्या जनजागृतीअभावी अद्यापही अनेक नागरिकांना परवान्यासंदर्भाची पूर्ण माहिती नाही. श्वानाच्या परवान्यासाठी सुरुवातीला दोन हजार रुपये भरावे लागतात. त्यानंतर प्रतिवर्ष ४०० रुपये भरावे लागत असतात.
ठाणे महापालिका क्षेत्रात पाळीव प्राण्यांसाठी पुरेशा सोयीसुविधा नसल्याने अनेकांनी परवान्यासंदर्भात माहिती असूनही परवाना काढलेला नाही. संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे ४,५०० श्वानांच्या मालकांनीच परवाना काढलेला आहे. त्या तुलनेत शहरात पाळीव श्वानांची संख्याही अधिक असल्याचे पशुवैद्यकीय विभागाला अंदाज आहे. मनुष्यबळाच्या अभावी श्वान परवान्याची नोंदणी रखडली होती. काही दिवसांपूर्वीच विभागामध्ये आणखी १० कर्मचाऱ्यांची नेमणूक या विभागात केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आता शहरातील विविध गृहसंकुलांमध्ये पशुवैद्यकीय विभागाने नोटिसा धाडण्यास सुरुवात केली आहे.
परवाना नसलेल्या श्वानमालकांनी परवाना काढावा. ज्या श्वानमालकांनी परवाना नूतनीकरण केलेले नाही त्यांनाही परवाना नूतनीकरण करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे पालन करणे टाळणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. गेल्या दोन दिवसांत १५० गृहसंकुलांमध्ये नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
परवान्यासाठी काय करावे?
एखाद्या व्यक्तीला नव्याने श्वान परवाना काढायचा असल्यास त्यास शुल्कासह एकूण दोन हजार अनामत रक्कम जमा करावी लागते. यामध्ये पुस्तिका, श्वानासाठी एक बिल्ला मिळत असतो. तसेच नूतनीकरणाचा वार्षिक परवाना हा ४०० रुपयांचा असतो. श्वानमालकांनी उथळसर येथील दर्शन टॉवरमधील कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
प्राण्यांसाठीच्या सुविधांचा अभाव
महापालिकेने अद्यापही पाळीव प्राण्यांसाठी दहनभूमी तयार केलेली नाही. आमच्या पाळीव प्राण्यासांठी उद्यान उपलब्ध नाही. आम्ही परवाना दरवर्षी नूतनीकरण करतो; परंतु त्याचा निधी महापालिकेकडे जमा असतात. त्यांनी प्राण्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे एका श्वानप्रेमीने सांगितले.
सर्वच श्वानमालकांचा शोध घेणे कठीण असते. त्यामुळे गृहसंकुलांमध्ये नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. नागरिकांनी त्यांच्या श्वानाचा परवाना काढून घ्यावा. श्वानाचा परवाना नसल्यास संबंधित मालकाचे श्वानही ताब्यात घेतले जाऊ शकते. – डॉ. क्षमा शिरोडकर, पशुवैद्यकीय अधिकारी, ठाणे महापालिका

नागरिकांनी त्यांच्या पाळीव श्वानांचा परवाना काढल्यास त्याची नोंदणी महापालिकेकडे राहील. तुमचे श्वान हरविले तर पोलिसांकडे तक्रार देणेही या परवान्यामुळे शक्य होते. तसेच भविष्यात पाळीव प्राण्यांसंदर्भात काही योजनाही महापालिकेच्या सहकार्याने तयार करणे शक्य होऊ शकते.-सुशांक तोमर, पशु कल्याण अधिकारी