ठाणे : ठाण्यातील अतिशय गजबजलेल्या भागात आयोजित करण्यात आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेमुळे मंगळवारी सकाळपासूनच ठाणेकरांना मोठय़ा वाहनकोंडीला सामोरे जावे लागले.
सायंकाळी होणाऱ्या सभेसाठी डॉ. मूस मार्गावर सकाळी ११ वाजल्यापासून मनसेने व्यासपीठाची उभारणी सुरू केली. त्यामुळे डॉ. मूस चौक ते चिंतामणी चौकापर्यंतचा रस्ता वाहतूक पोलिसांनी बंद केला. याच काळात ठाणे रेल्वे स्थानक तसेच आसपासच्या बाजारांमध्ये ये-जा करणाऱ्यांची यामुळे मोठी कोंडी झाली. कोर्टनाका ते उथळसर आणि जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यंत वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. अवघ्या पाच मिनिटांचे अंतर गाठण्यासाठी अर्धा ते पाऊणतास लागत होता.
कोर्टनाका येथे जाण्यास काही रिक्षाचालक नकार देत असल्याने अनेकजण भर उन्हात ठाणे स्थानकापासून पायी निघाले होते. अखेर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास येथील वाहतूक काही प्रमाणात कमी झाली खरी मात्र सायंकाळी कामावरून परतणाऱ्या ठाणेकरांचे सभेमुळे हाल झाले. याच वेळेत परिसरातील शाळा सुटल्याने शाळेच्या बसमुळे कोंडीत भर पडली. अनेक बस या कोर्टनाका येथील कोंडीत अडकून होत्या. त्यामुळे सॅटीस पुलावर प्रवासी बसची प्रतीक्षा करत असल्याचे चित्र होते.
गडकरी रंगायतनजवळील डॉ. मूस मार्ग येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सायंकाळी ६.३० वाजता सभा आयोजित केली होती. सकाळी ११ च्या सुमारास डॉ. मूस चौकात सभा नियोजनाचे काम सुरू झाले. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी डॉ. मूस मार्गावरील दोन्ही दिशेकडील मार्गिका वाहतुकीसाठी बंद केल्या. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला.
डॉ. मूस मार्गाच्या दिशेने जाणारा रस्ता बंद करण्यात आल्याने गोखले रोड, राममारुती रोड, गडकरी रंगायतनच्या दिशेने जाणारी वाहने ठाणे स्थानक व बाजारपेठेच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या रस्त्यांवरून वळवण्यात आली. जांभळीनाका ते उथळसर नाका, जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
सभेपूर्वीच ठाणेकर कोंडीमुळे हैराण
अध्यक्ष राज ठाकरे यांची सायंकाळी ६.३० वाजता सभा आयोजित करण्यात आली होती. सकाळी ११ च्या सुमारास डॉ. मूस चौकात व्यासपीठ उभारण्यासाठी तसेच खुच्र्याचे नियोजन करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी डॉ. मूस मार्गावरील दोन्ही दिशेकडील मार्गिका वाहतुकीसाठी बंद केल्या. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला.
डॉ. मूस मार्गाच्या दिशेने जाणारा रस्ता बंद करण्यात आल्याने गोखले रोड, राममारुती रोड, गडकरी रंगायतनच्या दिशेने जाणारी वाहने ठाणे स्थानक व बाजारपेठेच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या रस्त्यांवरून वळवण्यात आली. जांभळीनाका ते उथळसर नाका, जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

रस्ते हे वाहनांसाठी आणि चालण्यासाठी असतात. त्यातच शहरातील रस्ते अत्यंत अरुंद आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी भर रस्त्यात सभा घेणे चुकीचे आहे. उलट राजकीय पक्षांनी ठाणे महापालिकेकडे मैदाने उभारण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. कारण ठाणे शहरात मैदाने नसल्याने सर्वसामान्य घरांमधील लहान मुलांनी खेळायचे कुठे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. – डॉ. महेश बेडेकर, सामाजिक कार्यकर्ते.

ठाणे स्थानक ते कोर्टनाका गाठण्यासाठी मला २० मिनिटे लागली. भर रस्त्यावरील सभेमुळे ठाणेकर वेठीस धरले जात आहेत. – रणजीत पाटील, प्रवासी.


रस्त्यावरच सभा घेण्याचा हट्ट का?
राज ठाकरे यांची सभा ९ एप्रिलला होणार होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना काशिनाथ घाणेकर नाटय़गृह आणि हायलँड येथील मैदान असे दोन पर्याय सुचवले होते. हायलँड येथे मोठे मैदान उपलब्ध असतानाही भर रस्त्यात सभा घेऊन ठाणेकरांना वेठीस का धरले जाते, असा प्रश्न सर्वसामान्य ठाणेकर विचारत आहेत.


पोलीस उपायुक्तांची अरेरावी
डॉ. मूस रोड परिसरात अनेक नागरिक वास्तव्य करीत असून या नागरिकांना आज पोलिसांचा त्रास सहन करावा लागला. स्थानिक नागरिकांना देखील घरी जाण्यास सोडले जात नव्हते, अखेर नागरिकांना विनवणी करून कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर सोडले गेले. पोलिसांची दादागिरी मात्र रहिवाशांना पाहायला मिळाली.