ठाणेकरांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीची प्रतीक्षा

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

EKNATH SHINDE
एकनाथ शिंदे (संग्रहित फोटो)

ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे ठाण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे समर्थकांनी त्यांच्या स्वागताची तयारी सुरू केली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत शिंदे हे ठाण्यात आले नव्हते. यामुळे ठाणेकरांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीची प्रतीक्षा असल्याचे दिसून आले.

एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचे कळताच समर्थक त्यांच्या ठाण्यातील निवासस्थान परिसरात जमू लागले. काही वेळातच परिसरात समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर समर्थकांनी जल्लोष केला. ढोल-ताशांच्या तालावर थिरकत समर्थक आनंद व्यक्त करत होते. फटाक्यांची आतषबाजी करत समर्थकांनी एकमेकांना पेढे भरविले. पाऊस सुरू असतानाही शिंदे समर्थकांचा जल्लोष सुरू होता. समाजमाध्यमांवरूनही शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव समर्थकांकडून होत होता. टेंभीनाका तसेच जिल्ह्याच्या इतर भागांमध्येही समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. शहरात शिंदे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले होते. अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये लोकनाथ तसेच एकनाथ अशी गाणी ठेवली होती.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे शिष्य म्हणून एकनाथ शिंदे हे ओळखले जातात. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे हे टेंभीनाका येथील आनंद आश्रम आणि खारकर आळी भागातील दिघे यांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी येतील, अशी चर्चा ठाण्यात सुरू झाली होती. त्यामुळे त्यांच्या स्वागताची तयारी समर्थकांनी सुरू केली होती. पोलिसांनीही मुख्यमंत्री शिंदे हे ठाण्यात येणार आहेत की नाही याची माहिती घेण्यास सुरुवात केली होती.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thanekar waiting cm visit state chief minister eknath shinde supporters ysh

Next Story
शिंदे समर्थकांचा जल्लोष ; ठाणे जिल्ह्याला प्रथमच मुख्यमंत्री पद मिळाल्याने नागरिकांतूनही समाधान
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी