ठाणे – ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने ठरवून दिलेल्या ९१५ कोटींच्या उद्दीष्टापैकी ८७८ कोटी रुपयांचा कर वसुल केला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ६८ कोटी ३७ लाखांचा अधिक महसूल पालिकेला प्राप्त झाला आहे. सुमारे ८७.३७ टक्के कर हा डिजिटल आणि इतर आधुनिक माध्यमातून भरला गेला असून, ठाणेकर नागरिकांनी ऑनलाईन भरणा पद्धतीला स्पष्ट पसंती दिली आहे.

ठाणे महापालिकेने अर्थसंकल्पात मालमत्ता कर विभागाला ९१५ कोटींचे उद्दीष्ट ठरवून दिले होते. यापैकी ८७८ कोटी ३७ लाखांचा कर पालिकेने वसुल केला आहे. गेल्यावर्षी म्हणजेच, २०२४-२५ मध्ये ८१० कोटी रुपये कर संकलन झाले होते. त्याच्या तुलनेत यंदा ६८ कोटी ३७ लाख रुपयांचा अधिक महसूल प्राप्त झाला आहे. ठाणे महापालिकेने कर भरणा अधिक सुलभ करण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीलाच ऑनलाईन देयके उपलब्ध करून दिली होती.

एसएमएसद्वारे लिंक पाठवणे, विविध डिजिटल पेमेंट पर्याय उपलब्ध करणे, तसेच सर्व संकलन केंद्रांवरही सुविधा सुरू ठेवणे यामुळे करदात्यांना घरबसल्या कर भरणे शक्य झाले. या सोयींमुळे नागरिकांचा प्रतिसाद वाढून डिजिटल व्यवहारांचा वाटा लक्षणीयरीत्या वाढला. एकूण ८७८ कोटी ३७ लाखांच्या मालमत्ता कर वसुलीत धनादेश, डीडीद्वारे ५५.६७ टक्के, ऑनलाईन पद्धतीने ३१.६८ टक्के, तर रोखीने १२.६३ टक्के कर जमा झाला. डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे भरणा अत्यल्प म्हणजे ०.०२ टक्के इतकाच राहिला.

करवसुलीसाठी प्रयत्न

मालमत्ता कर संकलनात वाढ होण्यासाठी महापालिकेमार्फत विविध प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या, त्यामध्ये आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ऑनलाईन देयके उपलब्ध करून देणे, करदात्यांना तात्काळ प्रिंट देयके वितरण करण्यात आले. तसेच ऑनलाईन तसेच सर्व संकलन केंद्रांवर कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. जानेवारी ते मार्च दरम्यान सुट्टीच्या दिवशीही संकलन केंद्र सुरू ठेवण्यात आली होती.

ऑटो रिक्षाद्वारे जनजागृती, गृहनिर्माण संस्थांमध्ये मोबाईल व्हॅन कॅम्प, एसएमएसद्वारे कर भरण्याचे स्मरण देण्यात आले. त्याचबरोबर, ज्या करदात्यांनी विहीत मुदतीत कर भरलेला नाही, अशा करदात्यांच्या मालमत्तेवर वॉरंट बजावून जप्ती, सेवा खंडीत करणे व इतर कारवाई करण्यात आली. नवीन आर्थिक वर्षासाठी दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी मालमत्ता कर विभाग नियोजनबद्ध प्रयत्न करेल, असा विश्वास महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे.

मालमत्ता करवसुलीबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वरिष्ठ स्तरावर नियमीत आढावा घेऊन मार्गदर्शन केले. तसेच, प्रभाग स्तरावरील उप आयुक्त, सहायक आयुक्त, कर निरीक्षक, वसुली लिपीक व सर्व कर्मचारी यांनी मालमत्ता कर संकलनाकरिता प्रयत्न केले. मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे करण्यासाठी समाज माध्यम व प्रसार माध्यमांचाही उपयोग झाल्याची माहिती उपायुक्त (मालमत्ता कर) जी. जी. गोदेपुरे यांनी दिली.

प्रभागनिहाय कर संकलन (रक्कम कोटी मध्ये) उथळसर – ५२.५८

नौपाडा-कोपरी – ९७.०६

कळवा – २७.७६

मुंब्रा – ४५.०३

दिवा – ४३.४३

वागळे इस्टेट – ३५.२७

लोकमान्य सावरकरनगर – ३१.७१

वर्तकनगर – १२०.४०

माजिवडा-मानपाडा – २३६.५१

मुख्यालय व इतर – १८८.६२

एकूण : ८७८.३७ कोटी