ठाणे- ठाण्यातील ११ वर्षीय गिर्यारोहक ग्रिहिथा विचारे हिने अवघ्या ३३ दिवसांत भारतातील १६ राज्यांतील सर्वोच्च शिखरे सर करून अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केला आहे. ‘मिशन इंडिया समिट’ या मोहिमेद्वारे तिने केवळ धाडस आणि जिद्दीचे प्रदर्शन केले नाही, तर “बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ” आणि “सशक्त मुलगी म्हणजे सक्षम राष्ट्र” हा सामाजिक संदेशही देशभर पोहोचवला आहे.

धाडस, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर ठाण्यातील ११ वर्षीय युवा गिर्यारोहक ग्रिहिथा विचारे हिने अवघ्या ३३ दिवसांत भारतातील १६ राज्यांमधील १६ सर्वोच्च शिखरे सर करत उल्लेखनीय विक्रम नोंदविला आहे. ‘मिशन इंडिया समिट – १६ राज्ये, १६ शिखरे’ या विशेष मोहिमेद्वारे तिने केवळ गिर्यारोहण क्षेत्रात यश मिळवले नाही, तर “बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ” आणि “सशक्त मुलगी म्हणजे सक्षम राष्ट्र” हा सामाजिक संदेश देशभर पोहोचवण्याचे कार्यही केले.

या मोहिमेची सुरुवात २३ एप्रिल रोजी मुंबईतून झाली होती. तब्बल ३३ दिवस चाललेल्या या मोहिमेची यशस्वी सांगता २५ मे रोजी गुजरातमध्ये झाली. या काळात ग्रिहिथाने महाराष्ट्रातील काळसुबाई, कर्नाटकातील मुल्लायनगिरी, पश्चिम बंगालमधील संडकफू, मध्य प्रदेशमधील धुपगड, गुजरातमधील गिरनार यांसह विविध राज्यांतील सर्वोच्च शिखरांवर यशस्वी चढाई केली.

विशेष म्हणजे प्रत्येक शिखरावर तिने “बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ” या संदेशाचे बॅनर फडकावत मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व आणि महिला सशक्तीकरणाबाबत जनजागृती केली. अल्पवयात देशभरातील कठीण पर्वतशिखरे सर करत ग्रिहिथाने मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचा संदेश दिला आहे. तिच्या या धाडसी मोहिमेमुळे ती युवा पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

Grihitha Vichare Thane mountaineer record | Mission India Summit 16 peaks scaled | Young Indian female mountaineer achievements | Thane girl Grihitha Vichare trekking history
सौजन्य – लोकसत्ता टीम

या मोहिमेदरम्यान ग्रिहिथाने १५ विमानप्रवास केले. तब्बल ९,१४१ किलोमीटर हवाई प्रवास, ५,४८० किलोमीटर रस्ते प्रवास, ६१८ किलोमीटर रेल्वे प्रवास आणि १३० किलोमीटर पायी ट्रेकिंग करत तिने देशातील ३० हून अधिक शहरांचा प्रवास केला. यापूर्वीही ग्रिहिथाने उत्तराखंडमधील केदारकंठ तसेच हिमाचल प्रदेशातील माउंट युनाम यांसारखी अवघड शिखरे सर केली आहेत. गेल्या चार वर्षांपासून ती विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्वत मोहिमांमध्ये सहभागी होत असून अल्पवयातच गिर्यारोहण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.