scorecardresearch

मुख्यमंत्री शिंदे देवीच्या दर्शनासाठी येत नाहीत तोपर्यंत विसर्जन होणार नाही – ठाण्यातील नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्टची भूमिका!

स्वत:च्या बालेकिल्ल्यातील मंडळाच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?

मुख्यमंत्री शिंदे देवीच्या दर्शनासाठी येत नाहीत तोपर्यंत विसर्जन होणार नाही – ठाण्यातील नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्टची भूमिका!
मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भूमिकेवर ठाम आहेत.

राज्यभरात नुकताच नवरात्रोत्सव संपून सर्वत्र दसरा साजरा झाला आहे. कोविडच्या दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा सर्वत्र अगदी जल्लोषात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव साजरे करण्यात आल्याचे दिसून आले. घरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्येही मोठ्याप्रमाणावर उत्सव साजरे झाले. प्रथेनुसार नवरात्रोत्सवाची समाप्ती ही सर्वत्र दसऱ्याला होते. नऊ दिवस देवीची दररोज पूजा, आरती करून दसऱ्याच्या दिवशी काही ठिकाणी तिच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते तर काही ठिकाणी मूर्ती हलवली जाते. थोडक्यात नवरात्रोत्सवाचा दसरा हा शेवटचा दिवस असतो. परंतु ठाण्यातील एका मंडळाने अद्यापही देवीच्या मूर्तीचे विसर्जन केलेले नाही. याचे एक विशेष कारण असल्याचं समोर आलं आहे.

ठाण्यातील कळवा-विटावा येथील सूर्यनगर भागातील नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्टने हा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जोपर्यंत आमच्या उत्सवस्थळास भेट देत नाहीत तोपर्यंत आम्ही दुर्गा विसर्जन करणार नाही. आम्ही त्यांना याठिकाणी दर्शनास येण्याची विनंती केलेली आहे, परंतु कदाचित ते विसरले असतील. आम्ही त्यांना आता पुन्हा एकदा दर्शनास येण्याची विनंती करत आहोत, तोपर्यंत विसर्जन होणार नाही. अशी माहिती नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात अनेक ठिकाणच्या सार्वजनिक मंडळांमध्ये उपस्थिती लावली. अनेक मंडळांमध्ये त्यांनी महाआरती देखील केली. मुख्यमंत्र्यांच्या सार्वजनिक मंडळांच्या भेटींवरून विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधल्याचेही दिसून आले. आता नवरात्रोत्सव संपला तरीही मुख्यमंत्री आपल्या मंडळास भेट देतील अशी आशा बाळगून त्यासाठी दुर्गा विसर्जन थांबवणाऱ्या ठाण्यातील मंडळाच्या निर्णयावर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या