शहरीकरणाच्या या रेटय़ात जुन्या वास्तू नामशेष होत गेल्या अन् त्यांची जागा घेतली टोलेजंग इमारतींनी. जुन्या वास्तूंबरोबरच घरातील जुन्या दुर्मीळ गोष्टींनाही भंगाराची जागा दाखवण्यात आली; परंतु जुने व नवीन याचा उत्तम प्रकारे सुवर्णमध्य गाठणारा एक वाडा आजही कल्याणात इतिहासाची साक्ष देत उभा आहे. जुन्या कल्याणातील काणे वाडा आपले मूळ रूप कायम ठेवत जुन्या आणि नवीन संस्कृतींची सांगड घालताना आजही आपल्याला दिसून येतो.
सव्वाशे वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असणाऱ्या या काणे वाडय़ाच्या प्रवेशद्वारातच दोन संस्कृतींचा मिलाप झाल्याचे पाहायला मिळते. वातानुकूलित कार्यालय आणि त्यालाच लागून असलेल्या लाकडी दिंडी दरवाजातून वाकून काणे वाडय़ात प्रवेश करत आत यावे लागते. कमी उंचीचे दरवाजे हे कल्याणातील जुन्या वाडय़ांचे वैशिष्टय़च म्हणता येईल. वाडय़ाच्या या दिंडी दरवाजातून पुढे आल्यानंतर वाडय़ाचे पुढचे अंगण नजरेस पडते. नर्तिकेची मूर्ती, गणपती मूर्ती, सापाचे वेटोळे असलेले शिवलिंग, दगडी चौरंग, मँगलोरी कौलांतून साकारलेले तुळशीवृंदावन अशा विविध पुरातन गोष्टींच्या सान्निध्यात वाडय़ाचे अंगण बहरलेले दिसते. झाडांच्या सहवासातील या अंगणात कधीकाळी भलामोठा झोपाळाही होता; परंतु आज झोपाळा नसून या ठिकाणी केवळ झोपाळा अडकवलेल्या खुणा आणि झोपाळ्यासाठी असणारी चौकटच पाहायला मिळते. पूर्वीच्या काळी घरापासून काही अंतरावर शौचालय असण्याची पद्धत होती. त्यानुसार वाडय़ाच्या (पुढच्या अंगणाला लागूनच असणाऱ्या) बाजूच्या अंगणात शौचालय होते; परंतु काळानुरूप वाडय़ाजवळील भागात नव्याने आधुनिक शौचालये बांधण्यात आली. अंगणातून घरात प्रवेश केल्यानंतर पडवीचा भाग लागतो. या भागाचा वापर चपला काढण्यासाठी होत असे. आज या भागात काणे कुटुंबाचा अविभाज्य सदस्य असलेला ‘ब्लॅकी’ कुत्रा वाडय़ाची राखण करताना दिसतो. पडवीला लागून असलेल्या ओटीमध्ये पूर्वी रामचंद्र मोरेश्वर काणे यांचे सावकारीचे व्यवहार चालत असत. ओटीमध्ये भारतीय बैठकीची व्यवस्था होती. त्याचप्रमाणे सुपारी, अडकित्ता, पिकदाणी असे पानसुपारीचे साहित्य ठेवत घरात येणाऱ्या पाहुण्याचे आदरातिथ्य केले जाई. ही जागा आज लाकडी पलंगांनी घेतली असून ओटीचा उपयोग ‘वेटिंग रूम’ म्हणून केला जातो. ओटीमध्ये इतिहासाची साक्ष देणारे लामणदिवे आजही आपल्याला येथे पाहायला मिळतात. त्यांच्या उजेडात माजी शिक्षक आमदार प्रभाकर संत, माजी नायब राज्यपाल राम कापसे यांचा अभ्यास चाले.
वाडय़ातील ओटीच्या उजव्या बाजूला बाळंतिणीची खोली लागते. त्याचप्रमाणे वाडय़ामध्ये ओटीच्या डाव्या बाजूला एक, तर पुढच्या बाजूला दुसरे माजघर आहे. पूर्वी माजघराच्या जागेत भाताची कोठारे होती. माजघराचा वापर जेवण्यासाठी, सहज गप्पा मारायला बसण्यासाठी केला जाई. माजघर म्हणजे आजच्या घरांमधील ‘हॉल’. दोन माजघरांपैकी एक माजघर आजही शेणाने सारावल्याचे पाहायला मिळते. दिलीप काणे स्वत:च्या हाताने ही जमीन शेणाने सारवतात. माजघरात शिसव लाकडातून साकारलेले देवघर पाहायला मिळते. माजघरात एका बाजूला कपाटासारखी दिसणारी एक गोष्ट पाहायला मिळते. त्याला ‘फडताळं’ असे म्हटले जाते. सध्या फडताळाचा वापर अडगळीच्या गोष्टी ठेवण्यासाठी केला जातो. वाडय़ातील अन्य सर्व खोल्यांच्या जमिनी आधुनिक पद्धतीच्या फरश्यांनी साकारल्या गेल्या आहेत. माजघर आणि मागचे अंगण यादरम्यान मागची पडवी आणि स्वयंपाकघराचा परिसर लागतो. मागच्या पडवीचा वापर अडगळीच्या वस्तू ठेवण्यासाठी केला जातो. वाडय़ातील पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी या ठिकाणहून लाकडी जिन्याची सोय होती; परंतु आज हा जिना काणे कुटुंबीयांनी काढून टाकला आहे. पूर्वीच्या काळी वाडय़ात भाडेकरू ठेवण्याची पद्धत होती. या जिन्याचा वापर खास भाडेकरूंकडूनच केला जाई. काणे वाडय़ात १९३० ते अलीकडेच म्हणजे २००० पर्यंत भाडेकरू वास्तव्यास होते. वाडय़ात भाडेकरू असल्याने वाडा नेहमीच माणसांनी गजबजलेला असे. त्यामुळे साहजिकच वाडय़ाला कुलूप लावण्याची कधीही वेळ येत नसे, असे दिलीप काणे सांगतात.
वाडय़ातील स्वयंपाकघरात स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीस घराच्या दिंडी दरवाजात कोण व्यक्ती आली आहे, हे स्वयंपाक घरात बसून स्पष्ट दिसत असे; परंतु दिंडी दरवाजात असणाऱ्या व्यक्तीस स्वयंपाकघरातील गृहिणी दिसण्याची सोय नव्हती. यावरून सव्वाशे वर्षांपूर्वीचे भारतातील ‘स्थापत्यशास्त्र’ किती विकसित होते याची आपल्याला कल्पना येऊ शकते. पूर्वीच्या काळी वापरात असलेली ही स्वयंपाकघराची खोली वाडय़ातील दुसऱ्या खोलीत हलविण्यात आली आहे. वाडय़ाच्या मागच्या अंगणात गोठा, विहीर, नारळा-सुपारीची झाडे होती; परंतु आज या ठिकाणी अडगळीतील वस्तू टाकण्यात आल्याचे दिसून येते. काणे वाडय़ात काही शतके जुनी असणारी पोलादी तलवार पाहायला मिळते. हाताला जड लागणारी ही तलवार लांबीला जवळपास चार फूट आहे. त्याचप्रमाणे तांबे-पितळ्याची जुनी भांडी, चिनी मातीच्या बरण्या, ताक घुसळण्यासाठी वापरली जाणारी ‘रवी’, तांब्याचे भरीव मोदकपात्र आदी गोष्टी पाहायला मिळतात; परंतु या सगळ्या गोष्टी फक्त शोभेच्या वस्तू म्हणूनच आज गणल्या जातात. या सगळय़ा वस्तूंची जागा आज स्टीलच्या भांडय़ांनी घेतली आहे. वाडय़ातील सर्व मंडळींचे लहानपण ज्याच्यावर गेले, असा ‘लाकडी पाळणा’ही वाडय़ात चांगल्या अवस्थेत आहे.
काणे वाडा दुपाखी आहे. संपूर्ण लाकडी बांधकामात साकारलेल्या या वाडय़ाचा तळमजला २४ लाकडी खांबांवर उभा आहे. वाडय़ात काणे कुटुंबीयांची सहावी पिढी आज राहात आहे. वाडय़ाचा तळमजला पारंपरिक वाडा संस्कृतीचे दर्शन घडवितो खरे; परंतु वाडय़ाच्या पहिल्या मजल्यावर गेल्यानंतर वाडा पाहायला आलेला प्रत्येक माणूस अचंबित झाल्याशिवाय राहत नाही, कारण सव्वाशे वर्षांहून अधिक पुरातन असलेल्या या काणे वाडय़ाचा पहिला मजला अत्याधुनिक साधनसामग्रीने नटलेला दिसतो. किती हा विरोधाभास! तळमजल्यावर ओटी, पडवी, माजघर, अंगण असा पारंपरिक साज असलेला वाडा, तर पहिल्या मजल्यावर आधुनिक तंत्रज्ञान असलेले दूरचित्रवाणी संच, वातानुकूलित यंत्रणा, लाकडी पलंग आदी गोष्टींनी सजलेल्या खोल्या. विशेष म्हणजे वाडय़ाचा मूळ साज तसाच ठेवत काळानुरूप बदलत नवीन पिढीने हे बदल केले आहेत.
आणीबाणीच्या काळात संघाच्या गुप्त बैठका वाडय़ातील या खोल्यांमध्ये चालत असत. संघविचारांनी भारावलेल्या या वाडय़ाचा वापर कम्युनिस्ट क्रांतिकारकही भूमिगत होण्यासाठी करीत असत, असे दिलीप काणे सांगतात. काणे वाडय़ात माधवराव काणे, रामभाऊ कापसे, वामनराव साठे, गोपाळराव टोकेकर, भगवानराव जोशी, बापू लिमये, आबा बर्वे (पत्रकार) ही सर्व मंडळी एकत्र जमत असत. कल्याणात सामाजिक कार्य कशा प्रकारे सुरू होईल, यावर या ठिकाणी विचारविनिमय होत असे. यातूनच पुढे कल्याणात छत्रपती शिक्षण मंडळ, आदर्श सहकारी ग्राहक संस्था, कल्याण जनता सहकारी बँक अशा संस्थांचा उगम झाला. मल्लिकार्जुन मनसूर, मोगुबाई कुर्डीकर, राजन साजन मिश्रा, पं. जसराज, उस्ताद झाकीर हुसेन, शिवाजी सावंत, वसंत कानिटकर, जगन्नाथराव जोशी अशा अनेक मान्यवर मंडळींसोबतच्या ऋणानुबंधात काणे वाडा आजही इतिहासाची साक्ष देत ताठ मानेने उभा आहे.