लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : शहरात धुळवडीचा शुक्रवारी सकाळपासून उत्साह पाहायला मिळत आहे. गृहसंकुल, चाळीमध्ये आणि परिसरातील चौकात नागरिकांनी मोठ्या जल्लोषात धुळवड साजरी करत आहेत. तर, शहरात राजकीय धुळवडीचे रंग देखील दिसून आले. काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून विविध संस्थेच्या नावाखाली धुळवडीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांना ठाणेकर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

धुळवड सुट्टीचा दिवस असल्यामुळे शहरातील रस्त्यांवरही शुकशुकाट असल्याचे दिसत आहे. गृहसंकुल तसेच चाळीतील रहिवाशी एकत्र येऊन रंग खेळत आहेत, तर उपवन तसेच मासुंदा तलावाजवळ तरुणमंडळी एकत्रित येत धुळवड साजरी करत आहेत. शहरात विविध सामाजिक संस्थांकडून तसेच राजकीय पक्षांकडून धुळवडी निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा उत्साह पाहायला मिळत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रमात भेट देऊन दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला रंग लावला. तसेच दरवर्षी प्रमाणे यंदाही आनंद दिघे यांच्या टेंभीनाका परिसरात पारंपारिक पद्धतीने धुळवड साजरी करण्यात आली. आनंदाश्रम येथे धुळवडीच्या कार्यक्रमासाठी मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. याठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्ह्याच्या विविध भागातील कार्यकर्त्यांसह धुळवड साजरी केली.

तर, कळवा पारसिक नगर येथे राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) अभिजीत पवार यांनी यंदाही अभिजीत पवार आणि मित्र परिवारातर्फे ‘रंग दे कळवा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात तरुणांची मोठी गर्दी झाली आहे. ठाण्यातील वृंदावन सोसायटी येथील रंग जल्लोष मित्र मंडळा तर्फे ‘रंग जल्लोष २०२५’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावून धुळवड साजरी केली. तसेच आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण पूरक होळी साजरी व्हावी या उद्देशाने होळी विशेष सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण पूरक होळी साजरी करूया, नैसर्गिक रंगाचा वापर करूया असा संदेश यावेळी देण्यात आला.

काही भागात पोलिस यंत्रणा नसल्याने नियमांचे उल्लंघन

शहरातील अंतर्गत रस्त्यावर पोलीस यंत्रणा नसल्याने काही हुल्लडबाज तरुण नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवीत होते. तर, अनेक ठिकाणी वादाचे प्रकरही घडले. मद्याच्या दुकाना बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. तर, भांग घेण्यासाठीही नागरिकांनी दुकानांत गर्दी करत आहे. तर, वागळे इस्टेट भागातील काही रस्त्यांवर काही मंडळी बेशिस्तपणे मद्य पिण्यास बसलेले पाहायला मिळत आहे. याकडे पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.