पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने मराठवाडय़ातील ५०० जणांच्या जेवण व निवाऱ्याची व्यवस्था
नांदेडच्या मुखेड भागातून दुष्काळामुळे स्थलांतरित होऊन मुंबईत आलेल्या सुमारे ५०० जणांच्या कुटुंबांना ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील एका मोठय़ा छावणीत आसरा देण्यात आला आहे. मराठवाडय़ातून मुंबईत आलेल्या या लोकांसाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून ही छावणी उभारण्यात आली आहे. या छावणीत जेवण, पाणी आणि निवासाची सोय करण्यात आली असून, अशा स्वरूपाची ही दृष्काळग्रस्थांसाठी उभारलेली मुंबई उपनगरीय परिसरातली ही पहिलीच छावणी आहे. पुढील दोन महिने हे लोक या ठिकाणी राहू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मराठवाडय़ात दृष्काळाची तिव्रता वाढली असून पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करण्याची वेळ तेथील नागरिकांवर आली आहे. या भागातून दृष्काळाची तिव्रता टाळण्यासाठी काही नागरिकांनी स्थलांतर केले. घाटकोपरच्या भटवाडी परिसरात दत्ताजी साळवी मैदानाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत मराठवाडय़ातून आलेल्या या शेतकरी आणि शेतमजुरांची कुटुंबे येऊन राहत होती. मुंबईत हाताला काम मिळेल या आशेने आलेल्या या कुटुंबांना उघडय़ावरच आपले संसार थाटावे लागले होते. या ठिकाणीच त्यांचे सगळे दैनंदिन व्यवहार उघडय़ावरच चालले होते. दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातून येऊन अतिशय गैरसोयीमध्ये राहात असलेल्या या नागरिकांची व्यथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना समजली. त्यानंतर त्यांनी सोमवारी मध्यरात्री घाटकोपर येथे जाऊन या लोकांची विचारपूस केली. असुरक्षित अवस्थेमध्ये उघडय़ावर राहणाऱ्या या लोकांची परिस्थिती लक्षात घेऊन या मंडळींना सुरक्षित निवारा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रामनगर येथील एका मोकळ्या जागी छावणी तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मंगळवारी ही छावणी पूर्ण झाली असून रात्री पाच वाहनांमधून या स्थलांतरित लोकांना या छावणीच्या ठिकाणी पोहचवण्यात आले. त्यांच्यासाठी राहण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

अशी आहे व्यवस्था..
पुरुष आणि महिलांसाठी या ठिकाणी स्वतंत्र अशी तात्पुरती पत्र्याची बंदिस्त न्हाणीघरे बांधण्यात आली आहेत. प्रत्येकाला स्वयंपाक करता यावा म्हणून चुली देण्यात आल्या आहेत, तसेच ५ हजार लिटर्स पाण्याच्या तीन टाक्या बसविण्यात आल्या आहेत. संपूर्ण शिबिरात प्रकाश योजना करण्यात आली असून एक बोअरवेलही घेण्यात आली आहे. शौचालयाची व मैला साफ करण्याची व्यवस्थाही ठाणे महानगरपालिकेच्या मदतीने करण्यात आली आहे. या स्थलांतरितांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून पोलिसांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. या कुटुंबांना रोजगार मिळावा तसेच महिन्या दोन महिन्यासाठी हाताला काम मिळावे म्हणून विकासकांच्या संस्था, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि मनपाचे कंत्राटदार यांना काम देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.