उल्हासनगर: उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागात राधाबाई चौक येथील रामायणनगर परिसरात असलेल्या चार मजली द्वारका धाम इमारतीचा सज्जा गुरुवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास कोसळला. उल्हासनगर महानगरपालिकेने वेळोवेळी नोटीसा देऊन ही इमारत रिकामी केली होती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या इमारतीच्या ए आणि बी विंग असून त्यात एकूण ६६ सदनिका आणि एक दुकान होते. महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून घोषित केलेली होती. मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या इमारतीचा सज्जा कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सायंकाळी साडे सातच्या दरम्यान हा सज्जा इमारतीच्या बाजूला उच्च दाब वीज वाहिनीवर कोसळला.
हेही वाचा >>>डोंबिवलीत बँकेतून बाहेर पडताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले
त्यामुळे येथे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. घटनेची माहिती आयुक्त अजिज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आणि अग्निशमन तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तातडीने घटनास्थळी इमारतीच्या आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य करण्यात आला. काही काळ रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आली होती. आता सकाळी महानगरपालिकेच्या वतीने ही इमारत पाडण्यात येणार आहे.