वाहतुकीचे ‘अवजड’ दुखणे

सहा अवजड वाहने नितीन कंपनी ते कोपरी पूल या भागात बंद पडली. त्यामुळे पहाटे ३ ते दुपारी १ नंतरही या मार्गावर वाहतूक कोंडीचे चित्र होते.

दिवसभरात आठ ठिकाणी अवजड वाहने बंद पडल्याच्या घटना; वाहतूक कोंडीत भर

ठाणे : मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने गेल्या आठवडय़ाभरापासून वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या ठाणेकरांच्या त्रासात गुरुवारी बंद पडलेल्या वाहनांमुळे भर पडली. दिवसभर आठ ठिकाणी अवजड वाहने बंद पडल्याने संपूर्ण शहर पुन्हा कोंडीत सापडले.

त्यापैकी सहा अवजड वाहने नितीन कंपनी ते कोपरी पूल या भागात बंद पडली. त्यामुळे पहाटे ३ ते दुपारी १ नंतरही या मार्गावर वाहतूक कोंडीचे चित्र होते. ठाणे शहरातील खारेगाव, साकेत, घोडबंदर, कशेळी-काल्हेर, कळवा-विटावा या मार्गावरही खड्डे, वाहनांची वर्दळ असल्याने या मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती. अवघ्या १० मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना अर्धा ते पाऊण तास लागत होता.

मुंब्रा बाह्य़वळण मार्गिकेवर मोठा खड्डा पडल्याने ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना महापेमार्गे, कोपरखैरणे पुलाखालून ऐरोली, मुलुंड टोलनाका, आनंदनगर, कोपरी येथून ठाण्यात प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे कंटेनरचा भार हा पूर्व द्रुतगती महामार्गावर वाढला आहे. तर काही ट्रक आणि टेम्पोचालक मुलुंड आणि ऐरोली येथील टोल वाचविण्यासाठी पटणी येथून विटावा-कळवामार्गे येत आहे. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्ग आणि कळवा-विटावा या मार्गावर वाहतूककोंडी होत आहे. त्यातच गुरुवारी पहाटे ३ वाजेपासून शहरात वाहने बंद पडण्याचे सत्र सुरू झाले. यातील सहा अवजड वाहने ही कोपरी ते नितीन या दीड किलोमीटर अंतरामध्ये बंद पडली. अवघ्या १२ तासांत वाहने बंद पडण्याच्या घटना घडल्याने वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली. नितीन ते मुलुंड टोलनाक्यापुढे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत अनेक हलकी वाहने अडकून पडली होती. वाहतूक कोंडीमुळे अवजड वाहने बाजूला करण्यासाठी हायड्राही वेळेत पोहचत नव्हत्या. नितीन कंपनी, तीन हात नाका येथे मेट्रोचे मार्गरोधकही बसविले आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. कोपरी पूलही अरुंद आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत होती.

खारेगाव टोलनाका, साकेत पूल, घोडबंदर रोड येथे खड्डे पडल्याने खारेगाव ते कापूरबावडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खारेगाव आणि साकेत येथे राज्य रस्ते विकास महामंडळाने दोन वेळा खड्डे बुजविले होते. मात्र, त्यानंतरही पावसात हे खड्डे पुन्हा तयार झाले आहेत. वालधुनी येथेही एक दुधाचा टँकर बंद पडला होता. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. तर, घोडबंदर येथेही एक कंटेनर मेट्रोच्या मार्गरोधकाला जाऊन धडकला होता. त्यामुळे कासारवडवली भागातही वाहतूक कोंडी झाली.

वाहने बंद पडण्याचा घटनाक्रम

  • पहाटे ३.१४ वा. नितीन कंपनी उड्डाणपुलावर कंटेनर उलटला. स. ६ वाजण्याच्या सुमारास हा कंटेनर बाजूला करण्यात आला.
  • तीन हात नाका येथे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पहाटे ५.४८ वाजता एक कंटेनर बंद पडला.  सकाळी ७ वाजता हा कंटेनर बाजूला करण्यात आला.
  • नितीन कंपनी येथे सकाळी ६ वाजता ४२ टन लोखंडी पट्टय़ा असलेला कंटेनर बंद पडला. हा कंटेनर ७ वाजता बाजूला करण्यात आला.
  • कोपरी पूल येथे एक ट्रेलर स. ६.४० वाजता बंद पडला. स. ८.३० च्या सुमारास हा ट्रेलर बाजूला करण्यात आला.
  • नितीन कंपनी उड्डाणपुलावर सकाळी १० वाजता ट्रेलर बंद पडला. यामध्ये ३१ टन वजनाचे यंत्र होते. –  नितीन कंपनी येथे सकाळी ११.२० वाजता एक ट्रेलर बंद पडला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The heavy pain of transportation thane ssh

Next Story
सरस्वतीच्या साधनेने ‘लक्ष्मी’ प्रसन्न
ताज्या बातम्या