डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील पाचही फलाट, स्कायवाॅकवरील लोकल वेळ दर्शक बुधवारी सकाळी ७.१० ते सकाळी ८.३० यावेळेत बंद होते. दर्शक का बंद आहेत. फलाटावर कोणती लोकल येणार आहे अशी कोणतीही माहिती ध्वनीक्षेपकावरुन उद्घोषक देत नव्हता. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकाळी कामावर जाण्याच्या गडबडीत फलाटांवरील, रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागातील, स्कायवाॅकवरील दर्शक बंद असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. कोणत्या फलाटावर कोणती, कोणत्या वेगाची लोकल येणार आहे हे पाहून प्रवासी रेल्वे प्रवेशव्दारातूनच योग्य फलाटावर जाण्याचा निर्णय घेतात.

हेही वाचा >>> विश्लेषण: ठाण्यातील राजकीय संघर्षाला ठाकरे-आव्हाडांची जवळीक कारणीभूत?

बुधवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवेश केल्यानंतर दर्शनी भागातील लोकल वेळ दर्शक बंद होते. प्रवाशांनी फलाटावर प्रवेश केला तेथेही त्यांना दर्शक बंद असल्याचे दिसले. डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातून येजा करणारे अनेक प्रवासी स्कायवाॅकवरुन फलाटावर उतरतात. स्कायवाॅकवरील लोकल वेळ दर्शक बंद असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. रेल्वे स्थानकात लोकल येण्यापूर्वी उद्घोषकाकडून उद्घोषणा केल्या जातात. त्या आज सकाळी बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांच्या गोंधळात आणखी भर पडली.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण

दर्शक का बंद आहेत म्हणून प्रवासी स्थानक व्यवस्थापक कार्यालयात विचारणा करत होते. तांत्रिक कारणामुळे लोकल वेळ दर्शक बंद असल्याचे प्रवाशांना सांगण्यात येत होते. गेल्या वर्षभरात प्रथमच अशाप्रकारे डोंबिवली रेल्वे स्थानकातील पाचही फलाटांवरील लोकल वेळ दर्शक बंद असल्याचे दिसले, असे प्रवाशांनी सांगितले. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकातील लोकल वेळ दर्शक यंत्रणा आणि उद्घोषणा यंत्रणा बंद पडली होती. सव्वा तासानंतर ही यंत्रणा पूर्ववत करण्यात आली, असे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> दिवा कचराभुमी अखेर बंद

“ रेल्वे स्थानकात येण्यापूर्वी प्रत्येक प्रवासी लोकल वेळ दर्शक पाहून योग्य फलाटावर जातो. एखादी लोकल उशिरा धावत असेल तर प्रवासी त्याप्रमाणे लोकल वेळ निश्चित करुन प्रवास सुरू करतो. त्यामुळे दर्शक यंत्रणा सतत सुरू राहिल याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे. वर्षभरात प्रथमच डोंबिवली स्थानकातील दर्शक यंत्रणा बंद असल्याचा अनुभव आला.”

निरंजन कुलकर्णी प्रवासी, डोंबिवली

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The local time watch at dombivli railway station is half an hour off ysh
First published on: 01-02-2023 at 11:16 IST