अंबरनाथ : डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये असलेल्या उद्योग आणि औद्योगिक क्षेत्रामुळे अनेकदा प्रदुषणाच्या तक्रारी समोर येत असतात. मात्र या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी कल्याण येथील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयातून अधिकारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत प्रदुषणाची तीव्रता कमी झालेली असते. त्यावर तोडगा म्हणून आता एमआयडीसी कार्यालयातच प्रदुषण नियंत्रण मंडळांना जागा देण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत.

डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरात औद्योगिक वसाहती आहेत. अनेक कंपन्या येथे असून त्यात रासायनिक कंपन्यांचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षात या औद्योगिक क्षेत्रांमधील प्रदुषणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कंपन्यांमधून रासायनिक वायू सोडणे, प्रक्रिया न केलेले सांडपाणी, रसायने थेट जलस्त्रोतात सोडणे असे प्रकार केले जातात. त्यामुळे नाले, जलस्त्रोत किंवा कंपन्यापासून जवळ असलेल्या नागरी वस्त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत अनेकदा रासायनिक सांडपाणी सोडल्याचे समोर आले आहे. तर अंबरनाथमध्ये मोरिवली औद्योगिक क्षेत्रातून अनेकदा वायू गळतीच्या तक्रारी येत असतात. या औद्योगिक क्षेत्राशेजारी असणाऱ्या रहिवासी संकुलांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. बदलापूर शहरातही तीच परिस्थिती असून येथील खरवई, शिरगाव या भागातील नागरिकांना कंपन्यातून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक वायूचा त्रास होतो.

हेही वाचा : विवाहाच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बळकाविली मृताची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ; महिला अटकेत

याबाबत अनेकदा तक्रारी केल्या जातात. नागरिकांच्या संघटना, लोकप्रतिनिधी प्रदुषणाच्या तक्रारी कल्याणच्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाला करत असतात. मात्र या कार्यालयातून घटनास्थळी येण्यासाठी अधिकाऱ्यांना अर्धा ते एक तासापेक्षा अधिक कालावधी लागतो. अनेकदा नाल्यात सोडलेले सांडपाणी किंवा वायुगळतीची तीव्रता तोपर्यंत कमी होते. परिणामी प्रदुषणाचे ठोस पुरावे हाती लागत नाही. अनेकदा कंपन्यांचे यामुळे फावते. त्यामुळे या तक्रारींना तात्काळ तपासण्यासाठी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसीच्या कार्यालयातच जागा देण्याची सूचना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली. उद्योग मंत्री उदय सामंत यांंच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीत हा विषय चर्चेला आला. उद्योग मंत्र्यांनी तात्काळ एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना अशा जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे येत्या काळात एमआयडीसी कार्यालयातच प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दिसू शकतात.