जुन्या मलनिस्सारण चेंबर दुरुस्ती कामामुळेच खारटन परिसरातील रस्ता खचल्याची बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आली असून या विभागाने याठिकाणी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. हे काम होईपर्यंत हा मार्ग वाहतूकीसाठी बंद राहणार असून या मार्गावरील वाहतुक पर्याय मार्गांवरून वळविण्यात आली आहे. ठाणे पश्चिम स्थानकाच्या दिशेने येणाऱ्या बसगाड्यांना कळवा येथील क्रीकनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला असून यामुळे बसगाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. तर, हलकी वाहने दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, बाजारपेठ मार्गे स्थानकाच्या दिशेने सोडण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे येथील खारटन परिसरातील रस्ता हा पश्चिम रेल्वे स्थानक आणि कोपरी भागातील वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो. या मार्गावर कळवा, कोपरी, साकेत, कशेळी आणि काल्हेर च्या दिशेने वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. शेअर रिक्षा आणि बसची या मार्गावरून वाहतूक सुरु असते. सोमवारी रात्री या मार्गावरील ठाणा कॉलेज जवळील शीतला माता चौक परिसरात रस्ता खचून त्याला मोठे भगदाड पडले. हा प्रकार पाहून स्थानिकांनी तात्काळ मार्गरोधक लावून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. या रस्त्याखाली असलेली मलनिस्सारणची वाहीनी खुप जुनी असून परिसरात मलनिस्सारणाचे पाणी तुंबत होते. याबाबत तक्रारी येऊ लागल्याने पालिका अधिकाऱ्यांनी त्या परिसराची पाहाणी केली होती. त्यावेळी खारटन रस्त्यावरील मलनिस्सारण चेंबरची माती खचत असल्याने हा प्रकार घडत असल्याची बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली होती. यानंतर पालिकेने चेंबर दुरुस्तीसह वाहीनी बदलण्याचे काम हाती घेतले होते. हे काम सुरु असतानाच, लगतच्या रस्त्याखालील माती खचली आणि त्यामुळेच रस्त्याला मोठे भगदाड पडले. या घटनेनंतर स्थानिकांनी या मार्गवरील वाहतूक बंद केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आली आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली: ठाकुर्ली खंबाळपाडा-कांचनगाव मधील कोट्यवधीचा कर भरणा करणारे रहिवासी रस्त्याच्या प्रतीक्षेत

जुन्या रस्त्यांचे लेखापरिक्षण करण्याची मागणी
ठाणे शहरात सुरु असलेल्या रस्त्यांची कामे गुणवत्तापुर्वक व्हावीत या उद्देशातून आयआयटीच्या पथकामार्फत या कामाचे लेखापरिक्षण सुरु करण्यात आले आहे. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अशा स्वरुपाचा धाडसी निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्षात अमंलबजावणी सुरु केली असून त्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. याच धर्तीवर त्यांनी शहरात यापुर्वी तयार करण्यात आलेल्या प्रमुख जुन्या रस्त्यांचे लेखापरिक्षणही या पथकामार्फत करण्यात यावे, अशी मागणी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केली आहे. ठाणे शहरात यापुर्वी सात ठिकाणी अशाचप्रकारे रस्ता खचण्याच्या घटना घडल्या असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु अशा घटना सातत्याने घडू लागल्याने त्याकडे गांर्भीयाने लक्ष देण्याची गरज आहे. या रस्त्यांचे लेखापरिक्षण केले तर शहरात रस्ता खचण्याच्या घटना रोखण्याबरोबरच संभाव्य जिवीतहानी टाळणे शक्य होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The repair work of rough roads in thane has started amy
First published on: 28-03-2023 at 19:22 IST