scorecardresearch

कल्याणमधील पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील छत कोसळले

कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याण पश्चिमेतील रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या छताचा सिमेंटचा गिलावा रुग्ण उपचार घेत असलेल्या खोलीत कोसळला.

roof collap
( प्रतिनिधिक छायाचित्र )

कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याण पश्चिमेतील रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या छताचा सिमेंटचा गिलावा रुग्ण उपचार घेत असलेल्या खोलीत कोसळला. ज्या ठिकाणी गिलावा कोसळला तेथील रुग्णशय्येवर सुदैवाने रुग्ण उपचार घेत नव्हता. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती, अशी माहिता या घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदार रुग्णाने दिली.

स्मार्ट सिटीचा डंका पिटत असलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाची वेळोवेळी देखभाल, दुरुस्ती न केल्याने रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. इमारतीच्या बाहेर, रुग्ण खोल्यांमधील छताचा गिलावा पावसाचे पाणी मुरून खऱाब झाला आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या दुसऱ्या माळ्यावर पुरूष रुग्ण विभागात शनिवारी अचानक एका रुग्णशय्येवर छताचा खराब झालेला सिमेंट गिलावा (प्लास्टर) पडला. त्यामुळे या रुग्णशय्येच्या आजुबाजुचे रुग्ण घाबरले. उपस्थित परिचारिकांची धावपळ उडाली. गिलावा पडला त्या ठिकाणच्या रुग्णशय्येवर रुग्ण उपचार घेत असता तर तो गंभीर जखमी झाला असता, अशी माहिती या रुग्णालयात उपचार घेत असलेले अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी दिली.


या रुग्णालयात उपचारासाठी येणारे अनेक रुग्ण रुग्णालयाची दुरवस्था पाहून तेथील डाॅक्टरना रुग्णालयाची देखभार करण्याची सूचना करतात. अन्यथा मोठी दुर्घटना याठिकाणी घडण्याची भीती व्यक्त करतात. त्याची दखल वैद्यकीय विभागाकडून घेतली जात नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. बांधकाम विभागाला रुग्णालयातील परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. लवकरच देखभालीचे काम सुरू केले जाणार आहे, अशी माहिती रुक्मिणीबाई रुग्णालयेच प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी संदीप पगारे यांनी पत्रकारांना दिली. या रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे प्रभारींकडून रुग्णालयाकडे लक्ष दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत.

वैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष

वैद्यकीय विभाग बाह्यस्त्रोत नोकर भरती, बदल्या आणि इतर कामात सर्वाधिक व्यस्त असल्याने त्यांना रुग्णालय इमारत, तेथील दुरवस्थेचे गांभीर्य नसल्याची माहिती रुक्मिणीबाई रुग्णालयातील कर्मचारी खासगीत देतात. डोंबिवली एमआयडीसीत बंद पडलेल्या विभाग कंपनीच्या जागेवर सात कोटीहून अधिक रक्कम खर्च करून करोना केंद्र उभारण्यात आले. तीच रक्कम पालिकेच्या रुक्मिणीबाई, शास्त्रीनगर रुग्णालयात खर्च केली असती तर या ठिकाणी कायमस्वरुपी वैद्यकीय यंत्रणा उभी राहिली असती. परंतु, बांधकाम विभागाने करोनाच्या तिसऱ्या लाचेचे निमित्त करून कंपनीच्या जागेवर सुसज्ज करोना केंद्र उभे केले. पाच महिन्याच्या काळात एकही करोना रुग्ण या केंद्रात दाखल झाला नाही. अखेर न्यायालयाने या कंपनीवरील दावेदारांचे म्हणणे ऐकून विभा करोना केंद्राला सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदत वाढ देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. पालिकेला या केंद्रातून गाशा गुंडाळावा लागला. करदात्या जनतेच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याबद्दल रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे. या उधळपट्टीची विशेष तपास पथकाव्दारे चौकशी करण्याची मागणी ठाण्यातील धर्मराज पक्षाने शासनाकडे केली आहे.

आमदार मिहिल कोटेचा यांनीही या केंद्रातील उधळपट्टीची चौकशी आणि या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. येत्या १५ दिवसांनी सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात विभा कंपनीच्या जागेवरील करोना केंद्रातील गैरव्यवहार प्रकरणाचा विषय आ. कोटेचा यांनी अधिवेशनात उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशनातील प्रश्नाला शहर अभियंता की आरोग्य विभागाने उत्तर द्यावे यावरुन पालिकेत जोरदार धुसफूस सुरू असल्याचे कळते. विभा कंपनीच्या जागेवरील करोना केंद्रामुळे करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांची उधळपुट्टी झाल्याची बातमी ‘लोकसत्ता’ने दिली होती. या वृत्तामुळे पालिकेच्या मागे चौकशांचा ससेमिरा लागला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The roof of rukminibai hospital of kalyan municipality collapsed amy