पोलीस अधीक्षकांनी कसूर अहवाल मागवला; खातेनिहाय चौकशी सुरू, कारवाईचा इशारा

महामार्गावरील रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या जुगाराला अभय देणे वालीव पोलिसांना महागात पडले आहे. पालघर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा कसूर अहवाल मागवला असून पोलिसांची खात्याअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. आदेश दिल्यावरही जुगारावर किरकोळ कारवाई करून पांघरूण घालण्याचा प्रयत्न का केला याचा खुलासा पोलिसांना करावा लागणार आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मालजीपाडा येथे कृष्णा वॉटर पार्क नावाचे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये हायप्रोफाइल जुगार सुरू होता. पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या विशेष पथकाने या रिसॉर्टवर छापा घालून ६४ व्यापाऱ्यांना अटक केली. हे व्यापारी गुजरात राज्यातून, मुंबई आणि ठाण्यातून आलेले होते. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, लाखो रुपयांचा ऐवज मिळून दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे सर्व जुगारी मोठे व्यापारी होते आणि जुगार खेळण्यासाठी ते या रिसॉर्टला आले होते. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एवढा मोठा जुगार चालू असताना स्थानिक पोलीस काय करत होते, असा सवाल उपस्थित झाला आहे.

वरिष्ठांच्या डोळ्यातच धूळफेक

जुगारावर कारावाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली होती. सुरुवातीला पोलीस अधीक्षकांनी वालीव पोलीस ठाण्याला कारवाईचे आदेश दिले होते. मात्र वालीव पोलिसांच्या पथकाने केवळ चार जणांना ताब्यात घेऊन ६ हजारांचा मुद्देमाल दाखवला होता. त्यानंतर लगेच पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी आपले पथक पाठवून जुगाराचा अड्डा उघडकीस आणला. या प्रकरणामुळे पोलीस अधीक्षक संतापले. स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला नाममात्र कारवाई केली होती, असे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी सांगितले. या पोलिसांनी सुरुवातीला छापा टाकून कारवाई का केली नाही, कारवाईसाठी कोण कोण गेले होते त्यासंदर्भातील कसूर अहवाल मागवल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी दिली. एवढा मोठा जुगार चालतो ही गंभीर बाब आहे. या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

जुगाराचा मुख्य सूत्रधार कोण

पोलिसांनी या जुगाराच्या प्रकरणात शेट्टी नावाच्या व्यक्तीसह ६४ जणांना अटक केली आहे. मात्र मुख्य सूत्रधार कोण ते तपासात स्पष्ट होणार आहे. श्रावणात जुगार खेळल्याने लक्ष्मी प्रसन्न होते, असा समज या व्यापाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे ते जुगार खेळायला येतात. पूर्वी हा जुगार मीरा रोड येथे चालायचा. या जुगाराच्या आयोजनाच्या वेळी शाही बाडदास्त ठेवली जाते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. अशा जुगारापूर्वी सर्व पोलिसांचे ‘आशीर्वाद’ घेतले जातात, असेही पोलीस सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केली. मात्र स्थानिक पोलिसांनी कारवाई का केली नाही याचा खुलासा त्यांना करावा लागेल.

– अश्विनी पाटील, पोलीस उपअधीक्षक, वसई