सागर नरेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या २०२३ या वर्षात मार्च या एकाच महिन्यात तीन ऋतुंचा अनुभव ठाणे जिल्ह्यात अनुभवास आला. मार्च महिन्याच्या सुरूवातीला पहिल्या पंधरवड्यात तापमान चाळीशीपार गेले होते. त्यानंतर १६ मार्चनंतर काही दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यात आता गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट नोंदवली गेली असून हिवाळ्याचा अनुभव येतो आहे. पश्चिम विक्षोपाच्या प्रभावामुळे मार्च हा महिना तीनही ऋतुंचा अनुभव देणारा महिना ठरला आहे.

हेही वाचा >>>वसई-पनवेल रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या मराठी नावांची मोडतोड

काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे वातावरणात कमालीचे बदल पहायला मिळाले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षात दोन मोठ्या वादळांनी महाराष्ट्राच्या मोठ्या भागाला नुकसान पोहोचवले. त्यानंतर विविध भागात अवकाळी पाऊसही त्रासदायक ठरला. यंदाच्या वर्षात ठाणे जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या होत्या. त्यामुळे उन्हाळ्याची चाहून फेब्रुवारीतच लागल्याची चर्चा सुरू झाली. मात्र त्यानंतर मार्च महिन्यात वातावरण कमालीचे बदलले. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात धुळवडीला निसर्गाची धुळवड ठाणे जिल्ह्यात अनुभवायला मिळाली. सर्वत्र वाऱ्याने वळव्याच्या पावसाचे वातावरण निर्माण केले होते. तर ७ मार्च रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला. मात्र चारच दिवसांनंतर जिल्ह्यातील तापमानात उसळी पहायला मिळाली. ११ मार्च रोजी ठाणे जिल्ह्यातील तापमान चाळीशीपर्यंत पोहोचले होते. ठाणे, डोंबिवली या शहरांमध्ये ३९ अंश सेल्सियस तर मुरबाड तालुक्यात ४० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. मात्र १६ मार्च रोजी जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळला. बदलापूर आणि अंबरनाथसारख्या शहरांमध्ये अवघ्या दोन तासात २१ मिलीलीटर पावसाची नोंद या दिवशी झाली. त्यानंतर २१ मार्च रोजी पुन्हा जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. नवी मुंबई, मुंब्रा, ठाणे या शहरांमध्ये ३० मिलीलीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. तर उर्वरित जिल्ह्यात सरासरी २५ मिलीलीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली. मात्र २१ मार्च नंतर पुन्हा तापमानात काही अंशी वाढ झाल्याचे दिसून आले होते.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील कुंभारखाण पाड्यातील बेकायदा शिव सावली गृहप्रकल्पाला ‘महारेरा’ची नोटीस

मात्र गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा हिवाळ्याचा अनुभव येऊ लागला आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील तापमानात मोठी घट दिसून आली आहे. २६ मार्च रोजी जिल्ह्यातील सरासरी तापमान १७ अंश सेल्सियस इतके होते. बदलापूर शहरात सर्वात कमी १६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. तर ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीतील तापमान १७ अंश सेल्सियसवर होते. २७ मार्च रोजी तापमानात किंचित वाढ असली तरीही हवामानात गारवा होता. त्यामुळे मार्च या एकाच महिन्यात तीनही ऋतुंचा अनुभव जिल्ह्यात आला आहे. पश्चिम विक्षोपाच्या प्रभावामुळे हे सर्व होत असून सध्या स्वच्छ आणि निरभ्र आकाश आणि घटलेला दमटपणा यामुळे तापमानात घट असल्याची माहिती अभिजीत मोडक यांनी दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The temperature in march is forty degrees badlapur amy
First published on: 27-03-2023 at 16:19 IST