scorecardresearch

धुळवडीच्या रंगाची भीती जीवावर बेतली ; इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू

या घटनेमुळे अंबरनाथ शहरातील धुळवडीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे.

(प्रतिनिधिक छायाचित्र)

धुळवडीत रंग लावण्यासाठी आलेल्या मित्रांपासून दूर पळणाऱ्या एका तरुणाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे. अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात समोरील एका इमारतीत ही घटना काल(शुक्रवारी) घडली. या प्रकरण शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे अंबरनाथ शहरातील धुळवडीच्या उत्सवाला गालबोट लागलेले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी नगर परिसरात राहणारा सूरज दत्तात्रय मोरे (२६) धुळवडीच्या दिवशी दुपारच्या सुमारास आपल्या लहान भावासोबत शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या समोर निर्माणाधिन असलेल्या इमारतीखाली उभे होते. त्याचवेळी सूरज मोरे याचे काही मित्र त्याला रंग लावण्यासाठी आले. मात्र रंग लावण्याच्या भीतीने सूरज आणि त्याचा भाऊ समोरील इमारतीत लपण्यासाठी पळाले. सूरजचा लहान भाऊ हा पहिल्या मजल्यावरचा जाऊन थांबला. मात्र सूरज आणखी वर गेला. मित्रांनी सूरजच्या भावाला रंग लावून इमारतीखाली आणले. त्याचवेळी काहीतरी पडण्याचा आवाज आला. इमारतीच्या गच्चीवरून सूरज जमिनीवर पडल्याचा जोरदार आवाज आल्याचे सूरजच्या भावाने सांगितल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे. मात्र सूरजचा तोल कसा गेला? यावेळी गच्चीवर आणखी कोणी होते का? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

या घटनेनंतर सूरजचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The unfortunate death of a young man after falling from a building msr

ताज्या बातम्या