कल्याणमधील नाट्य, चित्रपटगृहे येत्या शुक्रवारपासून सुरू

कार्यक्रमापूर्वी बंदिस्त सभागृह, मोकळा मैदानाचा परिसर निर्जंतुक करणे आवश्यक आहे.

कल्याण : शासनाच्या करोना प्रतिबंधाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून चित्रपट, नाट्यगृह, जलतरण तलाव, बंदिस्त सभागृह आणि मोकळ्या मैदानातील कार्यक्रम सुरू करण्यास कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित संस्थाचालकांना येत्या शुक्रवारपासून (२२ ऑक्टोबर) परवानगी दिली आहे.

चित्रपट, नाट्यगृह, बंदिस्त सभागृह, जलतरण तलाव, मोकळ्या जागेतील कार्यक्रम घेताना मालक, संयोजकांनी करोना प्रतिबंधित लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना किंवा दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस झालेल्या प्रेक्षकांना कार्यक्रम ठिकाणी प्रवेश द्यायचा आहे. कार्यक्रम ठिकाणी प्रवेश देताना प्रेक्षकांचे तापमान तपासणी, हातधुणी, मुखपट्टी या प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत. या कार्यक्रमापूर्वी बंदिस्त सभागृह, मोकळा मैदानाचा परिसर निर्जंतुक करणे आवश्यक आहे.

जलतरण तलावाच्या ठिकाणी दोन मात्रा घेतलेल्यांनाच प्रवेश द्यावा. १८ वर्षांखालील मुलांना जलतरण तलाव ठिकाणी प्रवेश असला तरी, त्या मुलाने पालकांचे तलावाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे संमतीपत्र, वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड सोबत आणावे. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जलतरणपटूंना नियमित पोहण्याचा सराव करता यावा या उद्देशातून जलतरण तलाव सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. बंदिस्त सभागृहांमधील कार्यक्रम एकूण आसनक्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत सुरू करावेत. सार्वजनिक, मोकळ्या मैदानात कार्यक्रम घेताना संयोजकांनी सहा फुटांच्या अंतराने उपस्थितांना बसवायचे आहे, असे आदेश आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

शिकवणी चालक नाराज

खासगी नृत्यवर्ग, खासगी शिकवण्या सुरू करण्यास शासनाने पुढाकार घेतला नसल्याने संस्था चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  गेल्या दीड वर्षापासून नृत्यवर्गात सराव, प्रशिक्षण होत नसल्याने नवोदित नृत्याचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने नृत्यवर्ग, खासगी शिकवणीवर्ग सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी संस्था चालकांकडून केली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Theaters and cinemas in kalyan will start from next friday akp

Next Story
सरस्वतीच्या साधनेने ‘लक्ष्मी’ प्रसन्न
ताज्या बातम्या