scorecardresearch

कल्याण : मेल एक्सप्रेसमध्ये महिलांच्या पैशाच्या पिशव्या चोरणारा सराईत चोरटा अटक ; कल्याणमधील १३ चोऱ्या उघड

शहाजाद सय्यद असे चोरट्याचे नाव आहे. तो मूळचा अजमेरचा रहिवासी आहे.

कल्याण : मेल एक्सप्रेसमध्ये महिलांच्या पैशाच्या पिशव्या चोरणारा सराईत चोरटा अटक ; कल्याणमधील १३ चोऱ्या उघड
( महिलांच्या पैशाच्या पिशव्या हातोहात लांबविणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली )

मेल एक्सप्रेसमध्ये प्रवासी म्हणून प्रवास करुन महिलांच्या पैशाच्या पिशव्या हातोहात लांबविणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्याने देशाच्या विविध भागात मेल, एक्सप्रेसमधून प्रवास करुन फक्त महिलांच्या पैशाच्या पिशव्या चोरल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

शहाजाद सय्यद असे चोरट्याचे नाव आहे. तो मूळचा अजमेरचा रहिवासी आहे. कल्याण ते मुंबई परिसरात लोकल, मेल एक्सप्रेस, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या केल्यानंतर लपून राहण्यासाठी त्याने कल्याण मधील पत्रीपुला जवळील एका चाळीत भाड्याने खोली घेतली होती. शहाजाद कडून पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकात केलेल्या एकूण १३ चोऱ्या उघड केल्या आहेत. देशाच्या विविध भागात मेल एक्सप्रेस मध्ये प्रवास करुन त्याने अशाच चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे.

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या पैशाच्या पिशव्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रारी दाखल होत होत्या. या चोऱ्या करणाऱ्यांना पकडण्यासाठी कल्याण लोहमार्ग, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विशेष तपास पथक तयार केले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्शद शेख, साहाय्यक निरीक्षक प्रकाश चौगुले, शंकर परदेशी, हवालदार रंजीत रासकर, वैभव जाधव, अजित माने, चोरट्याच्या शोधात होते. कल्याण रेल्वे स्थानकात एका महिलेची पैशाची पिशवी हरवल्याची तक्रार कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तपास पथकाने रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून त्यात दिसणाऱ्या आरोपीची ओळख पटवून त्याचा शोध सुरू केला होता. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसणारा एक इसम रेल्वे स्थानक भागात फिरत असल्याचे तपास पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने त्याच्यावर पाळत ठेवली. त्याचा माग काढत त्याला सापळा लावून अटक केली.

शहाजादला यापूर्वी अहमदाबाद पोलिसांनी रेल्वेतील चोरी प्रकरणी अटक केली होती. कल्याण स्थानकासह देशाच्या इतर भागात रेल्वेत केलेल्या चोरीच्या बहुतांशी घटना शहाजादच्या अटकेने उघडकीला येतील, असा विश्वास वरिष्ठ निरीक्षक अर्शद शेख यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या